‘व्हॅलेंटाईन-डे’च्या मध्यरात्री नवविवाहित तरूणाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नानंतर सोळाव्याची पूजा होण्याअगोदरच नवविवाहित तरूणाचा ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कर्जत शहरात ही घटना घडली.
प्रवीण जालिंदर साबळे (वय 25, रा. गदादेनगर, कर्जत) हे मयताचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, साबळे यांचे मोठ्या थाटामाटात नुकतेच लग्न झाले होते. आज त्यांच्या लग्न सोळाव्याची पूजा होती. मध्यरात्री लघुशंकेसाठी ते झोपेतून उठले. बाथरूमकडे जात असताना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. पडण्याचा मोठा आवाज झाल्यामुळे घरातील इतर पळत बाथरूमकडे आले. त्यांना प्रवीण हे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले दिसले.

सहाय्यक पोलिस निरीक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या 

साबळे कुटुंबियांनी प्रवीण यांना उपचारासाठी तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे स्पष्ट केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. व्हॅलेंटाईन डे च्या मध्यरात्री व सोळाव्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या युवकाच्या मृत्यूच्या घटनेमुळे कर्जत शहरात शोककळा पसरली आहे.