भेटीसाठी ‘जाणत्या राजा’च्या निवासस्थानी पोहचले ‘युवराज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करलेल्या काँग्रेसच्या वर्तुळात पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे अस्वस्थतेचे वातावरण आहे. कार्यकारिणीकडे राजीनामा सोपविणाऱ्या राहुल गांधी यांचे मन वळविण्याचे प्रयत्नही अजून सफल झालेले नाही मात्र असे असताना गुरुवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी राहुल गांधी पवार यांच्या निवासस्थानी पोहचल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नेमकी ही भेट कशासाठी होती, हे गुलदस्त्यातच आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला मात्र तो स्वीकारण्यात आला नाही ;पण तरीही राहुल गांधी राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. अनेक दिग्गज त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न करीत असताना गुरुवारी शरद पवार याची भेट घेण्यासाठी राहुल गांधी हे पवार यांच्या निवासस्थानी पोहचले तत्पूर्वी काही राजकीय भेटीगाठी त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात केल्या. त्यानंतर राहुल गांधी यांनी पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.