10 रुपयाची नाणी न स्वीकारणाऱ्यांवर होणार कारवाई : रिजर्व बॅंक सहायक व्यवस्थापक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दहा रुपयांचे नाणे हे चलनात असून ते कोणीही नाकारु नये. बाजारपेठेत व्‍यापारी, विक्रेते तसेच नागरिक ही नाणी स्‍वीकारीत नसल्‍याचे प्रकार घडत आहेत. मात्र, अशी नाणी स्‍वीकारावीत. नाणी स्वीकारण्यास नकार देणार्‍यांवर कार्यवाहीही होऊ शकते, असा इशारा जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, रिजर्व बँकेचे सहायक व्यवस्थापक प्रवीण शिंदकर, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी दिला आहे.

सध्‍या अहमदनगर शहर व जिल्‍हयात दहा रुपयांची नाणी व्‍यापारी, विक्रेते, तसेच नागरिक स्‍वीकारत नाहीत, अशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे सदर नाणी बॅंकेत जमा करण्याचे प्रमाण वाढले आहे. सदर नाणी बंद झाल्याच्या अफवेमुळे बाजारपेठेत ही नाणी स्‍वीकारली जात नसल्‍याचे प्रकार घडत आहेत. मात्र, सदर नाणी चलनात असून कोणत्‍याही नागरिकांनी, व्‍यापारी, विक्रेत्‍यांनी सदर नाणी नाकारु नये, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

लगतच्‍या जिल्‍हयात तसेच इतर सर्वत्र दहा रुपयांची नाणी चलनात आहेत मात्र, असा प्रश्‍न केवळ नगर शहर आणि जिल्‍हयात भेडसावत आहे नागरिकांनी कोणत्‍याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये सदर नाणी चलनात असून ती सर्वांनी सवीकारावीत, असे आवाहन करण्‍यात आले आहे. सदर नाणी स्वीकारत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या तर अशी नाणी स्वीकारण्यास नकार देणार्‍यांवर कार्यवाहीही होऊ शकते.