कौतुकास्पद ! दररोज ३ किमी ‘पायपीट’ करुन शिक्षण घेतलेली श्वेता फडतरे हिवरे केंद्रात ‘प्रथम’

पोलीसनामा ऑनलाईन टीम (चंद्रकांत चौंडकर) – गराडे, भिवरी, बोपगाव, चांबळी व हिवरे या पाच शाळांच्या केंद्रात इयत्ता १० वी मध्ये श्वेता ज्ञानेश्वर फडतरे या विद्यार्थिनीने ९०.६० टक्के मार्क मिळवून हिवरे केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला. त्यामुळे पुरंदर तालुक्यात ३ किलोमीटर पायपीट करुन व अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या श्वेता फडतरे हिच्यावर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

श्वेता फडतरे ही पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री कानिफनाथ विद्यालय, भिवरी या विद्यालयाची विद्यार्थिनी असून हनुमानवाडी ते बोपगाव असे तीन किलोमीटर अंतर पायपीट करून शाळेत येत होती. घरची परिस्थिती बेताची असून श्वेताचे वडील हयात नसल्यामुळे आईने शिवणकाम करून मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. श्वेताला आणखी दोन बहिणी आहेत. आई शेतात काबाडकष्ट करून या तिन्ही मुलींचे शिक्षण करीत आहे.

बोपगाव (ता. पुरंदर) येथील हनुमानवाडी येथे मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते श्वेताचा पुष्पहार, शाल, श्रीफळ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्वेताची आई सीमा फडतरे, आजी वत्सला फडतरे, बहिण साक्षी फडतरे, रिया फडतरे, चुलते दत्तात्रय फडतरे तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते व शाळेचे माजी मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे उपस्थित होते.

पाचवी ते दहावी या वर्गात श्वेता प्रथम येत होती, शिष्यवृत्ती परीक्षेतही ती उत्तीर्ण आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाची तिला आवड असून इंजिनियर होण्याचा तिचा मानस असल्याचे तिने सांगितले.

पुरंदर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सतीशशेठ उरसळ, कार्याध्यक्ष अजितदादा निगडे, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड व उपमुख्याध्यापक मनोहर कामठे यांनी दहावीच्या वेळी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्गांचे नियोजन करीत सातत्याने मार्गदर्शन केल्यामुळे मला हे यश मिळाले असल्याचे श्वेता फडतरे हिने सांगितले.

शाळा समितीचे अध्यक्ष गुलाब घिसरे, संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब कुंजीर, खजिनदार शांताराम कटके, सचिव उत्तमराव निगडे व ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले.