दुर्देवी ! 45 दिवसानंतर 5 वर्षाच्या मुलाला भेटण्यासाठी हडपसरवरून निघालेल्या संगणक अभियंता ‘वडिल’ आणि डॉक्टर ‘आई’चा अपघातात मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णालयामध्ये रुग्णाशी सततचा संपर्क यामुळे आपल्या बाळाला त्रास होऊ नये, यासाठी डॉक्टर आई आणि संगणक अभियंता पिता यांनी 5 वर्षांच्या चिमुकल्याला आजीकडे गावी ठेवले. तब्बल दीड महिन्यानंतर आई-वडिल लेकराला आणण्यासाठी शुक्रवारी रात्री कारने गावी निघाले. मात्र, काळाने घात केला आणि उंब्रज गावच्या हद्दीत कारला अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. पोटच्या गोळ्याच्या भेटीसाठी निघाले, त्याची भेट झालीच नाही हो….

डॉ. अनुजा गावडे (वय 35) आणि अमित गावडे (वय 38, रा. दोघेही ग्रीन फिल्ड सोसायटी, हडपसर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. ते हडपसर (साडेसतरानळी) येथे राहत होते. डॉ. गावडे यांचा दवाखानाही येथेच आहे, तर अमित हे खराडी येथील एका नामांकित कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत होते.

अपघाताची माहिती मिळताच उंब्रज पोलीस, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलीम देसाई, रमेश खुणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघातात दाम्पत्य जागीच मृत्युमुखी पडले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या राहत्या परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने शोकाकुल वातावरणात दोघांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

डॉ. गावडे यांच्या रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत होती. त्याचा त्रास पाच वर्षांच्या अनिश याला होऊ नये म्हणून त्यांनी अनिशला मागिल दीड महिन्यापूर्वी बेळगावजळ राहणाऱ्या आजीकडे ठेवले होते. तब्बल दीड महिना चिमुकला आपल्यापासून दूर असल्याने आई-वडिलांच्या जीवाची घालमेल होत होती. त्यामुळे त्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्याचे पाहून शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता मुलाला आणण्यासाठी स्वतःच्या कारने महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर बेळगावजवळील गावे जात होते. शनिवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास उंब्रजजवळील भोसलेवाडी येथे अमित यांचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.