आदित्य ठाकरे ‘या’ विधानसभा मतदार संघातून लढणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणुकीसाठी वरळी विधानसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. वरळी आदर्शनगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनिल परब यांनी याबाबत जाहीरपणे मागणी केली आहे.

ठाकरे घराण्यातील कोणीही आजवर निवडणुक लढविली नाही. राज ठाकरे यांना मागील वेळी आग्रह झाला होता. पण त्यांनी अगोदर होकार देऊन नंतर नकार दिला. गेल्या काही महिन्यांपासून आदित्य ठाकरे यांनी निवडणुक लढवावी व थेट मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा खासदार संजय राऊत यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. शिवसैनिकांच्या मनातील इच्छेला शिवसेनेचे प्रवक्ते व विधान परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अ‍ॅड. अनिल परब यांनी मेळाव्यात वाट करुन दिली.

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनिल परब यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभेतून तिकीट देण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही शिवसैनिक मागणी करणार आहोत. जर आमची मागणी उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यास तमाम शिवसैनिक दिवसाची रात्र करुन विरोधकांचे डिपॉझिट जप्त करु असे ठोस आश्वासन आम्ही उद्धव ठाकरे यांना देऊ, असे त्यांनी सांगितले.

वरळी विधानसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर हे निवडून आले होते. गेल्याच महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तेव्हापासून वरळीतून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुक लढवावी अशी मागणी होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –