आदित्य ठाकरेंच्या सभेप्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या श्रीरामपूर येथील सभेसाठी रस्त्यावरच मंडप टाकल्याप्रकरणी कार्यक्रमाचे आयोजक व मंडप मालकाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करून बेकायदेशीरपणे मंडप टाकल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

निखील अनिल पवार, रणजित सुर्यभान शेळके (रा. वार्ड क्रमांक 7, श्रीरामपूर) ही आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पो.कॉ. राजू आसाराम महेर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन येथे सुमारे २ वर्षापासून नेमणुकीस असून पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे कामकाज पाहतो दि. १९/०७/२०१९ रोजी श्रीरामपूर शहरातील आझाद मैदानासमोरील मेनरोडवर दि. २२/०७/२०१९ चे दुपारी ०१.०० वाजता विजयी संकल्प मेळावा घेण्याची परवानगी मिळणेबाबतचा निखील अनिल पवार (रा. वार्ड नं. ७ श्रीरामपूर) यांनी त्यांचे लेटर हेडवर लेखी परवानगी मिळणेबाबतचा अर्ज पोलीस निरीक्षक श्रीरामपूर यांचे नावे पोलीस स्टेशनला दिला होता. पोलिस निरीक्षकांनी सूचना दिल्याने मी त्यांना संपर्क साधून त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले. ‘तुम्हाला रोडवर सभा घेता येणार नाही. सदरचा रस्ता हा श्रीरामपूर शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता आहे. आपण आपला कार्यक्रम हा मोकळ्या मैदानात घ्या. जेणे करुन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही’, अशा तोंडी सूचना दिल्या. त्यांना रस्त्यावर मेळावा घेण्याची परवानगी नाकारुन त्यांना गोपनीय जावक क्रमांकाने फौजदारी प्रक्रिया संहिता १४९ प्रमाणे नोटीसची बजावणी देखील करण्यात आली होती.

रविवारी (दि. २२) सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास मी पो.स.ई सूरवडे, पो.कॉ. पोकळे, पो.कॉ. पानसंबळ, पो.कॉ. जाधव, असे आम्ही सरकारी वाहणाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग फिरत असताना मेनरोड श्रीरामपूर येथे आझाद मैदानासमोरील मेन रोडवर काही इसम येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचा रस्ता अडवून रोडवर मंडप टाकताना दिसले. तेव्हा आम्ही त्यांचे जवळ जावून त्यांचेकडे सदरचा मंडप कोणाचा आहे. तुम्ही तो काणाच्या सांगण्यावरुन टाकत आहे, असे विचारले असता तेथे मंडपचे मालक रंजीत सूर्यभान शेळके (रा. वार्ड नं. ७, श्रीरामपूर) हे तेथे आले. हा मंडप माझ्या मालकीचा असून तो मी निखील अनिल पवार रा. वार्ड नं. ७ श्रीरामपूर यांचे सांगण्यावर टाकत आहे, असे कळविले. तसेच त्यावेळी तुम्ही रस्त्यावर मंडप टाकून सदरचा रस्ता अडवु नका, अशी त्यांना तोंडी सूचना दिली. त्यांनी मेनरोडवर आझाद मैदानासमोर एका बाजूस पूर्णपणे मंडप टाकून श्रीरामपूर ते बेलापुर जाणा-या लोकांचा रस्ता पुर्ण अडवुन तेथे जनसमुदाय बोलावून घेऊन कोणतीही परवानगी नसताना सव्वाचार वाजता तेथे सभा घेतली.

काल श्रीरामपूर ते बेलापूर जाणा-या मुख्य रस्त्यावर अनाधिकृत पणे स्टे मंडप टाकून येणा-या जाणा-या लोकांचा रस्ता अडवुन त्यांची गैरसोय करुन फौजदारी प्रक्रीया सहिता १४९ प्रमाणे दिलेल्या नोटीसची व सुचनांचे उल्लघंन करुन जनसमुदाय एकत्रीत करुन कुठलीही परवानगी न घेता सभा घेतली आहे. म्हणून निखील अनिल पवार रा. वार्ड नं. ७ श्रीरामपूर रणजित सुर्यभान शेळके रा. वार्ड नं. ७ श्रीरामपूर यांचे विरुध्द भा.दं.वि.कलम ३४१,१८८ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.