पांढर्‍या दुधाचा ‘काळा’ धंदा ; पाकीटबंद दुधात पाणी टाकुन विक्री (व्हिडिओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन (अमजद खान) – केमिकलपासून दुध बनविण्याच्या गोरख धंद्यांचा अनेक ठिकाणी पर्दाफाश झालेला असताना बीड सारख्या शहरात देखिल पांढर्‍या दुधाचा काळा धंदा करणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. बाहेरून येणार्‍या पाकीट बंद दुधात पाणी टाकुन घरगुती दुध म्हणून विकले जात असल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुध व्यवसायाकडे पाहिले जाते. बीड जिल्ह्यात दुध उत्पादक शेतकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खेड्या पाड्यातून शेकड्यावर लोक आपल्या गाई, म्हशींचे दुध घेवून मोटार सायकल किंवा सायकलवर शहरातील घराघरात पोहचवतात. मधल्या काळात कोर्‍या पाकीटात म्हशीचे दुध चौका चौकात उपलब्ध होताना पहावयास मिळते. चांगले व शुद्ध दुध मिळावे म्हणून ग्राहक पन्नास ते साठ रूपये लिटरचा भाव देवून हे दुध लहान मुलांना पिण्यासाठी आणि खाण्यासाठी वापरतात. असे असताना या पांढर्‍या दुधाला काळ्या धंद्याची झालर दिसू लागली आहे.

ज्या कंपन्यांचे नाव ऐकलेले नाही अशा कंपन्याचे पाकिटबंद दुध दुध विक्रेत्यांकडून खरेदी केले जाते. या दुधात पाणी टाकुन तेच दुध घरगुती आणि शुद्ध म्हशीचे असल्याचे भासवून ग्राहकांना दिले जाते. विशेष म्हणजे ग्राहकही जो व्यक्ती दुध घालतो त्याच्याकडे गाई, म्हशी आहेत की नाही, त्याने दिलेले दुध शुद्ध आणि योग्य आहे का? याची खातरजमा कधीच करत नाहीत. विश्‍वासावर चालणार्‍या या व्यावसायात विश्‍वासाला तडा जाणारे प्रकार समोर येत आहेत. बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात असलेल्या पाकीट बंद दुधाच्या एका विक्रेत्याकडे ग्राहक म्हणून सामान्य माणुस नव्हे तर दुध विक्रेत्यांचीच रांग लागलेली दिसते.

पहाटे 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मोटार सायकल आणि सायकली घेवून आलेले दुध विक्रेते कात्रिच्या सहाय्याने दुधाच्या पिशव्या फोडून आपले रिकामे कॅड भरतात त्यात पाणी टाकल्यानंतर हेच दुध लोकांच्या घरात पोहचते. त्यामुळे पांढर्‍या दुधाला बदनाम करणार्‍या लोकांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

फक्त गुटखा पकडायलाच प्रशासन का?

अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक कायदा हा सामान्य माणसाच्या आरोग्याचा आणि जिवीताचं रक्षण करण्यासाठी आहे. कुठल्याही खाद्यपदार्थामध्ये भेसळ होणार नाही, भेसळीतून आरोग्याला धोका निर्माण होणार नाही यासाठी अन्न आणि भेसळ प्रतिबंधक प्रशासनातील कर्मचार्‍यांवर शासन कोट्यावधी रूपयांचा खर्च करते. असे असताना गेल्या काही वर्षात या कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केवळ गुटखा पकडण्यापलिकडे दुसरी कारवाई केल्याचे कोणाच्या ऐकण्यात नाही. लायसन्स देताना किंवा कुठल्या हॉटेल, स्विट होम आदी ठिकाणचे पदार्थ तपासणे तर सोडाच किमान ते जावून पहाण्याची तसदी देखिल अधिकारी आणि कर्मचारी घेत नसतील.

पुर्वी दुधाची व्हायची तपासणी

अन्न आणि भेसळ प्रतिबंधक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी एकेकाळी दुधाची तपासणी करायचे. वीस वर्षापुर्वी सायकलवर दुध घेवून शहरात येणार्‍या दुध विक्रेत्याला रस्त्यातच थांबवून दुधाला डिग्री लागते का? दुधात भेसळ आहे का? यासाठी दुधाचे नमुने घ्यायचे परंतू आता हे काम त्या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी विसरून गेलेले दिसतात.

आरोग्यविषयक वृत्त