संभाजी ब्रिगेडचे अ‍ॅड. मनोज आखरे लोकसभेच्या मैदानात ?

सांगितला राजीव सातवांच्या जागेवर दावा !

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे सुञाकडून समजले आहे. अ‍ॅड. आखरेंनी त्यांच्यासाठी राहुल गांधींचे निकटवर्तीय व हिंगोली काॅंग्रेरसचे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या जागेवर दावा सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अ‍ॅड. मनोज आखरे हे सुद्धा हिंगोलीचेच रहिवासी असल्यामुळे त्यांनी काॅंग्रेसकडे सदर जागेसाठी आग्रह धरल्याचे समजते. तर या मागे राजीव सावत व अ‍ॅड. आखरे यांच्या मधील स्थानिक पातळीवरील मतभेद कारणीभुत असल्याचे बोलले जात आहे. अ‍ॅड. मनोज आखरेंच्या माध्यमातून हिंगोलीची लोकसभेची जागा काॅंग्रेसने संभाजी ब्रिगेडला सोडण्यासाठी सध्या एक शिष्ठमंडळ दिल्ली येथे ठाण मांडून असल्याचे समजते. सदर शिष्टमंडळामध्ये संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर,मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव व संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर व गंगाधर बनबरे आदीचा समावेश असल्याचे समजते.

सदर शिष्टमंडळाने काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन, त्यांचेकडे सदर जागा संभाजी ब्रिगेडला सोडण्यासंदर्भात जोरदार मागणी केल्याचे व राजीव सातव यांच्या निष्क्रियतेचा पाढा वाचल्याचे सुञांकडून समजले आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या मागणीला वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याची भुमिका घेऊन, धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकञित लढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची भुमिका मांडली असली तरी अंतिम निर्णय काय झाला हे अद्याप समजलेले नाही. परंतु, या निमित्ताने अ‍ॅड. मनोज आखरे व खासदार राजीव सातव यांच्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघातील जागेवर संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.