पालकांनो ‘ढवळा-ढवळ’ करू नका, मदत करा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – इयत्ता बारावीचे निकाल लागले आहेत. मुलांना करिअर निवडण्याची वेळ आली आहे. पाल्यांचे भविष्य काय यासाठी पालकवर्गाची ओढाताण सुरु आहे ; पण मुलांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, त्यांना काय बनायचे आहे यासाठी पालकांनी मदत करण्याची गरज आहे मात्र ती करताना कोणतीही ढवळा-ढवळ करू नये यासाठी या काही बाबी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

कारकीर्दीची वाट ठरवताना मुलांबरोबर पालकांचाही चांगलाच गोंधळ उडताना दिसतो. या पार्श्‍वभूमीवर मुलांच्या करिअर निवडीत पालकांची काय भूमिका असावी याविषयी काही मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

कारकीर्दीचा कोणता पर्याय निवडावा याबद्दल मुलांच्या मनात संदिग्धता असते. तरुण वय असल्याने व्यावसायिक आव्हानांशी भिडणं त्यांना आकर्षित करू शकतं. पण व्यवसाय आणि नोकरीमधील मूलभूत बदल त्यांना समजावून सांगावा. याशिवाय दोहोंमधील फायदे आणि तोट्यांची जाणीव करून द्यावी.
तरुण वयात मुलांना करिअरचे सगळेच मार्ग योग्य वाटतात. पण खरा कल कुठे आहे हे शोधायला त्यांना मदत करावी.

स्वत:ची अपूर्ण स्वप्नं मुलांकडून पूर्ण करून घेण्याचा हट्ट कधी करू नये. अनेक पालक विशिष्ट पदावर जाण्याची स्वत:ची अपूर्ण इच्छा मुलांकडून पूर्ण होईल अशी अपेक्षा बाळगतात. त्यामुळे त्यांच्यावर भावनिक ताण येतो. अशा वेळी केवळ पालकांना खुश करण्यासाठी मुलं करिअरचा वेगळा मार्ग निवडतात. पण यावेळी अपयशाचा मोठा धोका असतो. मुलांना जगभरातील करिअरच्या संधींची माहिती द्यावी.