दुष्काळी परिस्थितीत पाणी, चारा व मजुरांना काम द्या

पालक सचिव आशिषकुमार सिंग यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पाणी, जनावरांना चारा, व मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन द्या,असे निर्देश आज पालक सचिव आशिषकुमार सिंग यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पाणीटंचाई व दुष्काळ निवारणाच्या दृष्टीकोनातुन करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा पालक सचिव आशिषकुमार सिंग यांनी आयोजित बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने , निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सुरूवातीला निवासी जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, प्रकल्पातील पाणीसाठा, पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा, टँकर, विहिरींचे अधिग्रहण, पाणीपुरवठा, चाराछावणी, आदींबाबत प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती श्री. सिंग यांना दिली.

पालक सचिव श्री. सिंग म्हणाले, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असुन अशा परिस्थितीत मजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. ज्या गावातुन कामांची मागणी असेल त्या गावातील मजुरांना तातडीने कामे उपलब्ध करुन द्या. रोजगार हमी योजने अंतर्गत जास्तीत कामे सुरु करा,तीन दिवसात या कामांना मंजुरी द्या, मग्रारोहयो अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या कामांचा तालुकानिहाय आढावाही त्यांनी यावेळी घेतला.

पाऊस पडण्यासाठी आणखी बराच कालावधी बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे. मागणी व आवश्यकतेनुसार नागरिकांना पाण्याचे टँकर मंजुर करण्यात यावे. टँकरद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचा उद्भव गावापासुन जवळच असेल याची खात्री करावी.

पुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात यावी. तसेच टँकरच्या फेऱ्या योग्यरितीने होत आहेत किंवा नाही याची पहाणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. दुष्काळी परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी दक्षतेने व गांभिर्याने काम करण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. सिंग यांनी यावेळी सांगितले.

दुष्काळी अनुदान, पीएम किसान योजना,पीकविमा, पीककर्ज याबाबतही सविस्तर आढावा घेऊन दुष्काळी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्‍यात यावेत. बँक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात दक्षता घेऊन शासनामार्फत देण्यात येत असलेल्या अनुदानापासुन एकही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये. यासंदर्भात बँक अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देशही पालक सचिव श्री. सिंग यांनी यावेळी दिले. बैठकीस सर्व संबंधित यत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा योजनांची थकीत वीज देयकांच्‍याकारणामुळे योजना बंद असतील तर त्‍या पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरु कराव्यात, असे निर्देशही सिंग यांनीयावेळी दिले.

जिल्हाधिकारी श्री.व्दिवेदी यांनी टँकरची देयके जीपीएस लॉगबुक तपासूनच द्यावी, त्‍याबाबतची आवश्‍यक कागदपत्रे तपासून घ्‍यावी, अशा सूचना त्‍यांनी दिल्‍या.