शाळा बंद झाल्याने संतप्त पालकांनी मनपा महासभेत मांडला ठिय्या

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन –  रेल्वे स्टेशन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून महापालिका प्रशासनाने बंद केले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आज महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत जाऊन ठिय्या मांडला.
दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर बनलेला असताना महापालिका प्रशासन यावर ठोस निर्णय घेत नव्हते. त्यामुळे संतप्त पालक थेट महासभेत घुसले.
दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने रेल्वे स्टेशन येथील मनपा शाळेत माध्यमिक विभाग सुरू केला. तत्कालीन सभापतींच्या मान्यतेचे या शाळेत शिक्षक, मुध्याध्यापक, शिपाई ही पदे भरण्यात आली. तिन्ही वर्ग सुरू झाले. रेल्वे स्टेशन परिसरातील मागासवर्गीय, गोर-गरीब विद्यार्थ्यांना या शाळेचा लाभ मिळाला.
मात्र सदरचा माध्यमिक विभाग बेकायदेशीर असल्याने महापालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तेथील शिक्षकांनी अनेकवेळा प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवकांकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर महापालिकेच्या सभेत आज थेट पालकांनीच गोंधळ घालून शाळा सुरू करण्याची मागणी केली.
पालक, महिला थेट सभेत घुसल्या आणि त्यांनी चक्क ठिय्या मांडला. त्यामुळे महापालिका प्रशासनाची धांदल उडाली. दहावी उत्तीर्ण झालेल्या १६ विद्यार्थ्यांना त्यांचे दाखले आणि दहावीची गुणपत्रिका देण्यासही  प्रशासनाने मनाई केल्याने  त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासही अडथळे आले आहेत.
यामुळेही पालक चांगलेच संतप्त झाले आहेत. बेकायदेशीर असलेल्या शाळेच्या शिक्षक, शिपाई यांना आतापर्यंत मानधन दिले जात होते. ते मानधनही प्रशासनाने रोखल्याने त्यांच्यावरही नोकरीची टांगती तलवार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन करा, अशी मागणी पालकांची आहे.