नगरमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती ! आंतरजातीय विवाह केल्याने जोडप्याला पेटवले ; भाजून विवाहितेचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नेवासा तालुक्यातील ‘ऑनर किलिंग’ची घटना ताजी असतानाच नगर जिल्ह्यात आठवडाभरातच दुसरी धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून पारनेर तालुक्यातील निघोज येथे जोडप्याला एका खोलीत कोंडून पेटवून देण्यात आले. भाजून दोघेही गंभीर जखमी झाले असून उपचारादरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात मुलीचा मृत्यू झाला तर जावयावर उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी मंगेश व रुक्मिणी यांचा जबाब घेतला. पोलिसांनी तिचा मामा घनशाम राणेंज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना ताब्यात घेतले असून रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया हा फरार आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे १ मे रोजी त्यांची पत्नी रुख्मिणी मंगेश रणसिंग (वय १९) यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे गेले होते. त्यापूर्वी या पती-पत्नीचे किरकोळ वाद झाले होते. रुक्मिणी ही माहेरी निघून गेली होती. मंगेश रूख्मिणीला भेटण्यासाठी घरी गेल्यावर रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रुख्मिणीला मंगेश बरोबर न पाठवता त्याला मारहाण केली. यावेळी रुख्मिणी मात्र मंगेश बरोबर जाण्यास निघाली असता वरील तिघांनी या पती-पत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. घराला कूलूप लावून निघून गेले. शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मंगेश व रुक्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. दोघांच्या आंतरजातीय विवाहास तीचे वडील, काका व मामा यांचा विरोध होता. त्या आवाजातूनच दोघांचाही खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे पारनेर तालुक्यात जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर गंभीर भाजलेल्या दोघांनाही पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला तर जावयावर उपचार सुरू आहेत.