विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ साखर सम्राटांना हद्दपार करणार !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या विधानसभा निवडणुकीत शेवगाव पाथर्डी मतदार संघातील निकाल धक्कादायक लागणार असून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दोन्ही तालुक्यातील साखर सम्राटांना घरी बसवणार, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशमहासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाथर्डीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात आयोजित तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रकाश बापू भोसले, अरविंद सोनटक्के, तुकाराम पवार, छानराज क्षत्रे, शैलेंद्र बोंदाडे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या विधानसभा निवडणुकी पूर्वीची तयारी कशी करायची, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण व गाव निहाय कार्यकर्त्यांची यादी तयार करणे, कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेणे, प्रत्येक गावात सोशल इंजिनिअर, तसेच मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन वंचित बहुजन जोडो अभियान राबविले जाणार आहे. अशी माहिती प्रा. किसन चव्हाण यांनी या बैठकीत दिली. प्रा. किसन चव्हाण पुढे म्हणाले की, ‘आम्ही मॅनेज होणारे नव्हे तर डॅमेज करणारे आहोत’. हि बाब लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी संपुर्ण राज्याला दाखवून दिले. गेली ७० वर्षे सर्व बहुजन काँग्रेस राष्ट्रवादीच्या भाड्याच्या घरात राहत होतो. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने आम्हाला आमचे हक्काचे घर मिळाले आहे.  आणि हे घर अधिक मजबूत करून शाबूत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही इथून पुढच्या काळात करणार आहोत. सर्व सामान्य माणूस सत्तेत गेला पाहिजे असे स्वप्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाहिले. आणि लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित पुढाऱ्यांना धक्के देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले. लोकसभा निवडणुकी नंतर तुम्ही आमची मते मोजली मात्र आगामी विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आमचे आमदार मोजा असे आव्हान त्यांनी या वेळी दिले.

या वेळी प्रकाश बापू भोसले, छानराज क्षेत्रे, शैलेंद्र बोंदडे, राजेश मढीकर, सुरेश जावळे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महासचिव पदी निवड झाल्या बद्दल प्रा. किसन चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. अरविंद सोनटक्के यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. रवींद्र म्हस्के यांनी आभार मानले. या बैठकीस मोहसीन पठाण, जमीर पठाण, दादा बोर्डे, चंद्रभान पाखरे, दत्तात्रय साळवे, रामभाऊ जाधव, अशोक जावळे, राजू दौंडे, माणिक खवले, किशोर डाके, रामनाथ घुले, दिलीप नवगिरे, अमोल धोत्रे, अमीर शेख, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.