‘त्या’ जमिनीचा मोबदला न देताच नोटिसा ; शेतकरी वर्गात खळबळ

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईपलाईन प्रकल्पाला विरोध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जामखेड तालुक्यातील पाच गावांमधून जाणाऱ्या केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईपलाईन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकर्‍यांना मोबदला न देता त्यांनाच नोटीसा बजावल्या आहेत. तसेच शेतकर्‍यांनी अडवणूक केली तर त्यांच्यावर १९६२ कायद्याच्या तरतुदीनुसार शेतकर्‍यांवर कारवाईच्या नोटीसा बजावल्याने शेतकरी वर्गात एकच खळबळ माजली आहे. या बाबत शेतकर्‍यांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन पाईपलाईन खोदकामास विरोध दर्शविला आहे.

जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा, नायगाव, आनंदवाडी, बाळगव्हान व खर्डा या परीसरातील शेतकर्‍यांच्या शेतातून केंद्र सरकारची पेट्रोलियम पाईपलाईन जात आहे. याबाबत शेतकर्‍यांच्या जमिनी देखील संपादित केल्या आहेत. परंतु शेतकर्‍यांना या जमिनीचा एक दमडीही मोबदला दिला नाही. त्यामुळे रविवारी (दि १२) आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटना व जिव्हाळा फाउंडेशन जामखेडच्या वतीने खर्डा परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

या प्रसंगी प्रहार संघटनेचे राज्यउपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, जिव्हाळा फाउंडेशनचे सिद्धार्थ आप्पा घायतडक ,गुलाब जांभळे ,गणेश हगवणे, विष्णु शिंदे, बाळासाहेब खाडे, सुनील सानप, प्रल्हाद गीते, विकास गोपाळघरे, सचिन गोपाळघरे, अर्चना ताई गोपाळघरे, चेअरमन प्रभाकर सांगळे सह परीसरातील शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यात आल्या. त्यामध्ये शेतकऱ्यांना पाईपलाईन खोदलेल्या जमिनीचा मोबदला किती मिळेल, कधी मिळेल, याबाबत संभ्रमावस्था आहे. तसेच शेतजमिनी मेनरोड च्या बाजूला असल्यामुळे बाजारभाव जास्त आहे. तसेच काहींच्या जमिनीत फळबागा व फुलझाडे आहेत. काहींची घरे, विहिरी, गोठे देखील याच भागात आहेत तरी शासनाने सर्व अडचणींचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. कायद्याच्या चौकटीत आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रहार संघटना व जिव्हाळा फाउंडेशनच्यावतीने शेतकऱ्यांना आश्वासन दिले अशी माहिती शेतकरी मार्केट चे संचालक व प्रहार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली. जो पर्यंत शेतकर्‍यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांच्या पाठीशी प्रहार संघटना खंबीर पणे उभी रहाणार आहे, असे देखील पवार म्हणाले.