‘ते’ प्रकरण ‘ऑनर किलिंग’ की पतीनेच केली हत्या ? मयत मुलीच्या भावाच्या ‘स्टेटमेंट’ने संभ्रम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पारनेर तालुक्यातील निघोज येथे झालेले प्रकरण सैराट चित्रपटाप्रमाणे ‘ऑनर किलिंग’ आहे की पतीनेच पत्नीची हत्या केली, असा समज तयार झाला आहे. मुलीच्या भावाने दिलेल्या स्टेटमेंटमुळे नेमके सत्य काय आहे हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलगी व जावयाचा पेटवून दिल्याप्रकरणी भाजून जखमी झालेल्या मुलीच्या मृत्यूपूर्व जबाबावरून तिचे वडील, काका व मामाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मयताच्या सहा वर्षाच्या भावाने पोलिसांना दिलेल्या जबाबापासून ‘ऑनर किलिंग’ ऐवजी दुसरीच चर्चा सुरू झाली आहे. मयत मुलीच्या भावाने पोलिसात दिलेल्या जबाबात मंगेश रणसिंग यांनी पेट्रोल टाकून पत्नी रुख्मिणी हिला पेटवून दिले. पेट घेतल्यानंतर रुख्मिनीने मंगेशला मिठी मारली. त्यामुळे दोघे जखमी झाले, असे म्हटले आहे.

मयताचा मृत्यूपूर्व जबाब व मयताच्या सहा वर्षाचा भावाने दिलेल्या जबाबमध्ये विसंगती आली आहे. त्यामुळे मयत मुलीने दिलेला जबाब खरा की तिच्या दहा वर्षाच्या भावाने दिलेला जबाब खरा, असा पेचप्रसंग तयार झाला आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा चांगली संभ्रमात पडली आहे. या प्रकरणातील नेमके सत्य काय आहे, हे शोधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.