Exit Poll 2019 : नगरमध्ये चुरशीच्या लढतीत विखेंना ‘फटका’ तर संग्राम जगतापांना ‘बुस्ट’ मिळणार ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागण्यास अवघे तीन दिवस उरले आहेत. राजकीय तज्ज्ञ व विविध ‘एक्झिट पोल’नुसार नगरमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली आहे. कोण निवडून येईल, हे सांगणे कठीण आहे. विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये मतांचा अतिशय कमी फरक राहिल. विखे यांना फटका बसून राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप हे विजयी होतील, अशी शक्यताही वर्तविली जाऊ लागली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 64.26 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नगरची लढत अतिशय चुरशीपूर्ण वातावरणात पार पडली. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणूकीकडे लागले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी बंडाचा झेंडा फडकावत भाजपमध्ये प्रवेश केला. सोशल मीडियावर वारंवार ‘ट्रोल’ होणे, सत्तेसाठी विखे कुटुंबीय काहीही करू शकतात अशी चर्चा, भाजपच्या निष्ठावंतांची नाराजी, ग्रामीण भागात भाजप सरकारबद्दल शेतकऱ्यांची असलेली नाराजी याचा मोठा फटका भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना बसला. त्यामुळे मोठी ताकत लावूनही, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा घेऊनही नगरचा विजय विखे यांच्यासाठी सोपा नव्हता.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. संग्राम जगताप यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार ताकद लावली होती. काही एक्झिट पोलमध्ये नगरच्या जागेबाबत अस्पष्टता दाखवली जात आहे. नगरची लढत अतिशय चुरशीपूर्ण वातावरणात पार पडली. विजय व पराभूत उमेदवारांमध्ये अवघ्या दहा वीस हजारांच्या मतांचा फरक राहू शकतो, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

नगरच्या जागेबाबत ठामपणे सांगणे कठीण असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. संग्राम जगताप हे बाजी मारून डॉ. सुजय विखे यांना मोठा धक्का बसू शकतो, असे सांगितले जात आहे. एकूण राजकीय परिस्थितीच नव्हे, तर पक्षांतर्गत विरोधकांचाही मोठा फटका त्यांना बसला आहे. एक्झिट पोलचे अंदाज काहीही असले तरी अंतिम निकालासाठी 23 मे ची प्रतीक्षा करावी लागेल.