दोषी कोण…पैठणकर, जिल्हाधिकारी द्विवेदी की आयुक्त भालसिंग ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गंभीर आरोप ठेवून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. पैठणकर यांना तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निलंबित केले होते. पैठणकर यांची चौकशी पूर्ण होण्याअगोदरच त्यांना पुन्हा घनकचरा व्यवस्थापन विभागातच आयुक्त भालसिंग यांच्या मान्यतेने हजर केले आहे. चौकशी पूर्ण होण्याअगोदरच त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी हजर केल्यामुळे अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. आदेशात म्हटल्याप्रमाणे कार्यालयीन शिस्त मोडून पैठणकर यांनी महापालिकेची जनमानसात बदनामी केली आहे का? त्यांना निलंबित करून तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची चूक झाली आहे, की आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी चुकीच्या पद्धतीने पैठणकर यांना हजर करून घेतले, अशा प्रश्नांचा गुंता तयार झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यावर मंथन करून योग्य कार्यवाही करण्याची आवश्यक आहे. अन्यथा आयुक्त भालसिंग यांनी काढलेला चुकीचा पायंडा प्रशासकीय व्यवस्थेसाठी घातक ठरणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. पैठणकर यांनी कार्यालयीन शिस्त मोडून महापालिकेची जनमानसात बदनामी करणारे कृत्य केले. कामात अक्षम्य हलगर्जीपणा, निष्काळजीपणा केला. वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे, महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारे गैरवर्तन, कालबद्ध कार्यक्रमाची विहित मुदतीत पूर्तता न करता नागरिकांना लाभापासून वंचित ठेवणे असे गंभीर आरोप ठेवून पैठणकर यांना तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मान्यतेने सेवेतून निलंबित करण्यात आले होते. तसेच त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी अजून पूर्ण झालेली नाही. चौकशी पूर्ण होण्याअगोदरच ज्या विभागातून पैठणकर यांना निलंबित केले गेले, त्याच विभागात पुन्हा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या मान्यतेने हजर करून घेण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे ज्या घरातून चोराने चोरी केली, त्याच घरात झालेल्या चोरीचा तपास चालू असताना चोराला घरात राहण्यास परवानगी देण्यासारखे आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागातील गैरप्रकाराबाबत पैठणकर यांची चौकशी चालू आहे, ती चौकशी होण्याअगोदर त्यांना हजर करून घेणे म्हणजे त्यांना चौकशीतील पुरावे नष्ट करण्यास मदत करण्यासारखे आहे. तरीही त्यांना हजर करून घेतले आहे म्हणजे यातून प्रश्न असा निर्माण होतो की, पैठणकर यांनी खरंच चूक केली म्हणून त्यांना निलंबित केले? की चुकीचे आरोप ठेवून तत्कालीन आयुक्त राहुल द्विवेदी यांनी पैठणकर यांना निलंबित केल्याने विद्यमान आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी त्यांना पुन्हा हजर करून घेतले? आयुक्त भालसिंग यांची भूमिका योग्य आहे की तत्कालीन प्रभारी आयुक्त द्विवेदी यांची भूमिका योग्य होती, असा प्रश्न निर्माण होतो.

नेमकी चूक कोणाची आहे. महापालिकेची समाजातातील जनमानसात बदनामी करण्यासारखे गैरवर्तन केले म्हणून जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आयुक्त म्हणून एका अधिकाऱ्याला निलंबित करतो आणि निलंबित केलेल्या अधिकाऱ्याची चौकशी पूर्ण होण्याअगोदर दुसऱ्या विभागाऐवजी त्याच विभागात त्याला दुसरा आयुक्त हजर करून घेतो, यातून महापालिका प्रशासनाची समाजात बदनामी होणार नाही का? द्विवेदी यांनी केलेली कारवाई योग्य होती व आयुक्त भालसिंग यांनी सारासार विचार न करता त्यांना हजर करून घेतले की द्विवेदी यांनी कारवाई चुकीची केली म्हणून आयुक्त भालसिंग यांनी ती चूक दुरुस्त करून त्यांना हजर करून घेतले. नेमकी चूक कोणी केली? तत्कालीन प्रभारी आयुक्त द्विवेदी की विद्यमान आयुक्त भालसिंग यांनी असा प्रश्न निर्माण होतो.

पैठणकर यांना हजर करण्यामागे प्रशासनाचा बचाव असा आहे की, घनकचरा व्यवस्थापन पाहण्याची पात्रता असलेला महापालिकेकडे फक्त पैठणकर नावाचे एकमेव आरोग्य अधिकारी आहेत. म्हणून त्यांना हजर करून घेतले. परंतु प्रशासनाची बाजू जरी आपण समजून घेतली, तरी दुसरा प्रश्न निर्माण होतोच. एखाद्याला एका कामाची जबाबदारी दिली, ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याऐवजी तेथे गुन्हा केल्याचा आरोप झाला. पण ती जबाबदारी त्याने यापूर्वी पार पडली, म्हणून त्याने केलेला गुन्हा माफ करायचा का, असा प्रश्न पडतो. पैठणकर यांनी चुकीचे कृत्य केले की नाही, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. परंतु चौकशी करायच्या अगोदरच त्याला पवित्र करून घेण्याचा, शासकीय सेवेला शोभा न देणारा नवीन पॅटर्न तर अहमदनगर महापालिकेत सुरू झाला नाही ना, अशी शंका उपस्थित होते.

एखाद्या प्रकरणाची चौकशी चालू असताना त्या चौकशीत व्यत्यय येईल शकतो, असे कृत्य करणे हे शासकीय सेवेला अभिप्रेत आहे का? हे बेशिस्तीचे वर्तन नाही का? ही कार्यालयाची आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पैठणकर दोषी आहेत की नाही, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. परंतु त्यांची चौकशी नि:पक्ष होऊ नये, यासाठी व्यत्यय येईल असे कृत्य करणारे आयुक्त दोषी नाहीत का? या प्रशासकीय भूमिकेमुळे निश्चित अहमदनगर महापालिका प्रशासनाबद्दल एक संशय निर्माण झाला आहे. याचे उत्तर आयुक्त भालसिंग यांना द्यावेच लागेल, अन्यथा प्रशासकीयदृष्ट्या महापालिकेची समाजात बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –