पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात वाळू तस्करांवर महसूल प्रशासन ‘मेहरबान’ ; चलन न भरताच वाहने सोडली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – वाळू तस्करांवर मेहरबान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी पंचनामा करून दंडाचे बँक चलन न भरताच वाळूने भरलेला टॅक्‍टर सोडून दिला. याशिवाय दोन ट्राली मध्ये सुमारे 5 ब्रास वाळू असतानाही अवघ्या दोन ब्रास वाळूचा पंचनामा
केला, अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पालकमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत तहसील कार्यालयात घडला.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील कोरेगांव येथील कान्हवळा नदीपात्रामध्ये बेकायदेशीर व राजरोसपणे वाळू उपसाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना कळविल्यावर 1 जून रोजी रात्री 7 वाजता भरारी पथकाने अचानक छापा टाकून एक टॅक्‍टर व दोन वाळूने भरलेली ट्राली पकडली होती. या टॅक्‍टरमध्ये सुमारे 5 ब्रास वाळू असून 6 लाख रूपयांचा माल जप्त केला होता. ही जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आणून लावण्यात आली होती.
दुपारी दोन वाजता ही वाहणे 2 ब्रास वाळू दाखवत सुमारे 1 लाख 60 हजार रूपये दंडाची फक्त पावती करून सोडून देण्यात आली आहेत.

यावर दंड अकारणी केल्यावर बॅक चलन भरून घेतल्यावरच वाहन सोडावे, असे असतानाही रविवारचे बँक चलन कसे भरले? असा प्रश्न उपस्थित होतो. महसूल प्रशासनाने ही मेहरबानी दाखवण्यामध्ये नेमका कुठल्या व्यक्तीचा दबाव होता, यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.