टँकरचे पाणी वेळेवर मिळेना नूतन खासदारांच्या बैठकीत नागरिकांच्या तक्रारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – टँकर मंजूर असूनही पाणी वेळेवर मिळत नाही, नियमित खेपा येत नाहीत, अशा तक्रारी कर्जत तालुका टंचाई आढावा बैठकीत नागरिकांनी केल्या. खा. डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली.

 

‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास लोकांचे प्रश्न तातडीने मार्गी लागून अधिकारी व लोकांचा संपर्क वाढेल, असा सल्ला विखे यांनी यावेळी दिला. येत्या पाच वर्षांमध्ये आपण दक्षिणेतील कामकाजाची पद्धत बदलणार आहोत. प्रत्येक गावातील प्रलंबित प्रश्न मला लेखी स्वरूपात कळवा. ते कसे सुटतील, यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालून ते सोडवू, असेही ते म्हणाले.

या बैठकीत जनावरांच्या छावण्या, पाण्याचे टँकर, रोजगार हमी योजना, कर्जतचा पाणी व वीज प्रश्न, सामाजिक वनीकरण विभागाची कामे याबाबत चर्चा झाली. ८४ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पण मंजूर खेपा वेळेवर व नियमित होत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या. भीमा नदीतील पाणी संपल्यामुळे कर्जत शहराला गेल्या पंचवीस दिवसांपासून पाणी नाही. कर्जतला पाणी पुरवठा करण्यासाठी १८ टँकर मंजूर केले आहेत. पण याचा ठेका दिलेल्या संस्थेकडे टँकरची टंचाई असल्यामुळे कर्जतला फक्त दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय अनेक ग्रामपंचायती व विविध संस्थांनी घेतला आहे. मात्र सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

या बैठकीस नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, जिल्हाबँकेचे बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, पंचायत समितीच्या सभापती साधना कदम, उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक शहाणे, स्वप्निल देसाई, दादासाहेब सोनमाळी आदी उपस्थित होते.

कर्जत तालुक्यात ९७ छावण्या सुरू आहेत. छावणी चालकांना होत असलेल्या त्रासाचा या बैठकीत उहापोह झाला. ऑनलाईन पद्धत, रोज बदलणारे नियम, बारकोड पद्धत, बिल मंजूर करण्यासाठी १० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लागणा या पाच प्रकारचे ऑडिट, विविध प्रकारच्या तपासण्या या प्रकारांमुळे छावणी चालक वैतागले आहेत.