शहरातील अनेक भागात आज पाणीपुरवठा नाही

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे आज शहराच्या अनेक भागात पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, विळद पंपिंग स्टेशनजवळील बुऱ्हानगर पाणी योजना केंद्रावर महावितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम शनिवारी रात्री दहापर्यंत सुरूच होते. रात्री उशिरा दुरुस्ती झाली. या काळात वीज पुरवठा बंद असल्याने पाण्याचा उपसा होऊ शकला नाही. त्यामुळे आज शहरातील मध्यवर्ती भागासह अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना एका दिवसाच्या पाणीटंचाईचा फटका बसला आहे.

सोमवारपासून पाण्याचा नियमित पुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.