पाच तासाच्या खोळंब्यानंतर एअर इंडियाची उड्डाणं सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्व बाबी तंत्रज्ञानावर सोपविल्यानंतर त्यात जर काही किरकोळ जरी बिघाड झाला तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचा अनुभव एअर इंडिया व तिच्यावर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना शनिवारी पहाटेपासून आला आहे.

एअर इंडियाचा सीता सर्व्हर पहाटे साडेतीन वाजता बंद पडला. त्यामुळे संपूर्ण देशभरातील विमानांचे उड्डाण ठप्प झाले. हा सर्व्हर तब्बल ५ तासाने सुरु झाला असल्याची माहिती संचालक अश्विनी लोहाणी यांनी नुकतीच दिली आहे.

एकीकडे नुकसानीच्या गर्तेत अडकलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला आज मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. सर्व्हर बंद पडल्याने मुंबई, दिल्लीसह देशभरातील सर्व विमानतळावर एअर इंडियाच्या प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

पहाटे साडेतीन पासून एकाही विमानाचे उड्डाण न झाल्याने कंपनीला तोटा तर होणार आहेच. त्याचबरोबर प्रवाशांच्या विश्वासालाही या घटनेमुळे धक्का बसला आहे. आता सर्व्हर सुरु झाला असला तरी आतापर्यंत खोळंबून राहिलेली उड्डाणे पूर्ववत करण्यास काही तास लागणार आहे. त्याचबरोबर एअर इंडियाच्या विमानाचे वेळापत्रक बदलले गेल्याने त्यांना आता धावपट्टीवर उड्डाणासाठी वेळ उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे.