राज्यात पूरपरिस्थिती ! मंत्री गिरीश महाजन डान्स करण्यात व्यस्त, अजित पवारांचा सरकारवर ‘हल्लाबोल’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादच्या गंगापूर येथे शिवस्वराज्य यात्रा पोहचली. दोन दिवसात या यात्रेला जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मराठा समाजासाठी गोदावरी नदीत उडी मारुन बलिदान दिलेल्या काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आणि अभिवादन करून यात्रेला सुरवात केली. सांगली आणि कोल्हापूरमध्ये भीषण पूरपरिस्थिती असताना भाजपचे नेते महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. तर दुसरीकडे गिरीश महाजन नाचण्यात व्यस्त आहेत. अशा प्रकारची चौफेर टीका यावेळी अजित पवार यांनी सरकारवरती केली.

जनतेची कामे करणं भाजप सरकारला जमत नाही. हे राज्यातील पूरस्थितीवरून दिसून येते आहे. आम्ही सरकारमध्ये असताना बोट घेऊन मदतीला जायचो, पालकमंत्र्यांच्या बैठका घ्यायचो, असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र मुख्यमंत्री जिथे जातात तिथे कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते. राज्यात हुकूमशाही आणि दडपशाही सुरू असल्याचा आरोप सुद्धा अजित पवार यांनी यावेळी सरकारवर केला.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार विक्रम काळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण आदींसह पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like