चंद्रपूरात ‘दारुबंदी’ हटवण्यासंबंधित कोणताही विचार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे डॉ. बंग यांना ‘स्पष्टीकरण’

चंद्रपूर :  पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रपूरातून दारुबंदी हटवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी याला विरोध केला होता. परंतु आता चंद्रपुरात दारुबंदीसंबंधित कोणताही पुर्नविचार केला नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे, दारुबंदी हटवण्याच्या बातम्या हा खोडसाळपणा असल्याचे ते म्हणाले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांना संपर्क करुन दारुबंदीवर पुनर्विचार केला नसल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे.

डॉ. अभय बंग यांनी यासंबंधित प्रेसनोटमधून अजित पवारांशी फोनवरुन झालेल्या दारुबंदी संबंधित झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यात अभय बंग म्हणाले आहेत की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मला सांगितले की मी महसूलासंबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली, राज्य उत्पादन शुल्क विभागाशी चर्चा केली, परंतु त्यात मी अधिकाऱ्यांना दारुबंदी हटवण्यासंबंधित कोणताही आदेश दिलेला नाही. कोणीतरी खोडसाळपणा करत माझ्या नावे चूकीची माहिती माध्यमांना दिली. तसेच असा निर्णय घेण्याचा आधिकार मला किंवा इतर कोणत्याही मंत्र्याचा नसून केवळ कॅबिनेट या संबंधित निर्णय घेऊ शकते. त्यामुळे दारुबंदी हटवण्यासंबंधित येणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही.

असे असले तरी काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार चंद्रपूर, गडचिरोलीतील दारुबंदी हटवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक होते. त्यांनी एक निर्णय देखील दिला होता, एक समिती देखील गठीत करण्यास सांगितले होते, परंतु असा निर्णय घेण्याचा आधिकार कोणत्याही मंत्र्याला नाही आणि तसा विचार देखील सरकारचा नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितल्याचे डॉ. अभय बंग म्हणाले.

दारुबंदीसाठी बंग कुटूंबीय प्रत्यत्नशील आहेत. चंद्रपूर, गडचिरोली भागात दारुबंदी असावी ही त्यांची मागणी आहे. परंतु एकीकडे विजय वड्डेटीवार हे दारुबंदी हटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या चर्चा असताना आता अजित पवारांकडून या संबंधित स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एक वाक्यता नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.