धक्कादायक ! ‘यासाठी’ मुलींचे कपडे उतरवून केली तपासणी

भटिंडा : वृत्तसंस्था – पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील एका खासगी विद्यापीठात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघड झाल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली आहेत. वसतीगृहाच्या शौचालयात सापडलेले सॅनिटरी पॅड कोणी टाकले, हे शोधून काढण्यासाठी विद्यापीठातील एका होस्टेलच्या मुलींना कपडे उतरवायला भाग पाडून तपासणी करण्यात आली. वसतीगृहाच्या वॉर्डननी दोन महिला सुरक्षा रक्षकांच्या मदतीने १२ पेक्षा अधिक मुलींची तपासणी केली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. तलवंडी साबो येथील अकाल विद्यापीठात हा प्रकार घडला. याची माहिती बाहेर पडल्यावर विद्यापीठाच्या ६०० ते ७०० विद्यार्थ्यानी जोरदार निदर्शने केली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने दोन महिला वॉर्डन आणि दोन महिला सुरक्षा रक्षक यांची हकालपट्टी केली आहे.

निदर्शने करणाऱ्या मुलांनी सांगितले की, वॉर्डनविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. वॉर्डन आणि प्रशासनाविरोधात आम्ही मजबूतीने उभे राहिलो आहोत. वॉर्डनच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या विद्यापीठातील वातावरण प्रचंड पुरातनवादी असून मुला मुलींना एकमेकांशी बोलण्याचीही परवानगी नाही, असे विद्यार्थ्यानी सांगितले.