पोलिस दलात खळबळ ! SP कडून PI ला ‘अश्लील’ भाषेत शिवीगाळ, निरीक्षक ‘सीक’मध्ये, IGP कडे तक्रार

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस अधीक्षकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला असून पोलीस निरीक्षक सिक मध्ये गेले आहेत. या प्रकरामुळे अकोला जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत नाईकनवरे यांनी म्हटले आहे की, कामावर हजर झाल्यापासून पोलीस अधीक्षकांनी शिवीगाळ केली आहे. तसेच ते अपमानीत करून खच्चीकरण करत आहेत. त्यांच्या मानसिक छळामुळे प्रकृती खाराब झाली आहे. तसेच 10 एप्रिल रोजी दुपारी कक्षात बोलावून शिवीगाळ करून प्रेताची विल्हेवाट लावण्याबाबत आमची परवनगीशिवाय पत्र का दिले असा जाब विचारून अपमानीत केल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी पत्र पाठवून पोलीस अधीक्षकांची तक्रार केली आहे.

तसेच पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी तात्काळ परिक्षेत्रातील इतर जिल्ह्यात बदली करण्याची मागणी केली आहे. पोलीस अधीक्षकांनी केलेली शिवीगाळ आणि दिलेल्या मानसीक त्रासाबद्दल योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी केली आहे. सुरेश नाईकनवरे हे सध्या सिकमध्य गेले असून पोलीस अधीक्षकांनी केलेल्या शिवीगाळ ऑडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (ठाणेदार) सूरेश हरिभाऊ नाईकनवरे यांची बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश अकोल्याच्या पोलिस अधीक्षकांनी तात्काळ काढले आहेत.