‘त्या’ ६०० कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल ७६४ लाख रुपये

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – सुट्यांच्या काळात बंद असलेल्या कामाच्या ठिकाणांवरील (वर्कसाईटस्) एच-वन बी कर्मचाऱ्यांना आवश्यक तेवढे वेतन न दिलेली अमेरिकन कंपनी पॉप्युलस ग्रुप जवळपास ६०० एच-वनबी कर्मचाऱ्याना १.१ दशलक्ष डॉलर (७६३.३७ लाख रुपये) वेतन म्हणून परत करण्यास तयार झाली आहे.

या ६०० कर्मचाऱ्यात मोठ्या संख्येने उच्च-कौशल्ये असलेले भारतीय आयटी व्यावसायिक आहेत.
कामगार वेतन आणि तास विभागाने केलेल्या चौकशीत पॉप्युलस ग्रुपने सुट्यांच्या काळात बंद असलेल्या कामाच्या ठिकाणांवरील एच-वनबी कर्मचाऱ्याना आवश्यक तेवढे वेतन दिलेले नाही, असे आढळले होते. मिशिगनमधील ट्रॉयस्थित पॉप्युलस ग्रुप या कर्मचाऱ्यांना वेतन तर परत करणार आहेच. एकूण ५९४ एच-वनबी कर्मचाऱ्यांना त्यांचे न मिळालेले वेतन मिळणार आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले.

एच-वन बी फॉरीन लेबर सर्टिफिकेशन प्रोग्रॅमचा उद्देश अमेरिकन कंपन्यांना हवे असलेले अति उच्च कौशल्याचे अमेरिकन मनुष्यबळ उपलब्ध नाही, हे त्यांनी सिद्ध केल्यावर तसे मनुष्यबळ शोधण्यासाठी मदत करणे हा आहे, असे वेज अँड आवर डिस्ट्रिक्ट डिरेक्टर टिमोलीन मिशेल यांनी सांगितले. तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिलेल्यांमुळे तशीच नोकरी मिळालेल्या अमेरिकन कामगारांवर विपरीत परिणाम होऊ नये आणि एच-वन बी नॉन इमिग्रंट कामगारांचे संरक्षण होण्यासाठी कायद्याने निश्चित स्वरूपाची व्यवस्था तयार केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.