‘तो’ वचपा काढण्यासाठी शिवसेनेचे आता ‘आंबेगाव’ लक्ष्य !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोकसभा निवडणुकीत ‘चौकारा’च्या तयारीत असणाऱ्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी दारुण पराभव केला, मात्र डॉ. कोल्हेंच्या विजयाचे ‘किंगमेकर’ असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांना येत्या विधानसभा निवडणुकीत ‘खिंडीत’ गाठण्यासाठी शिवसेनेने आतापासून आंबेगाव मतदारसंघाला ‘ लक्ष्य ‘ केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या १५ वर्षांच्या कारभाराचे ‘पोस्टमार्टेम’ करताना जुन्नर, खेड आणि शिरूर या विधानसभा मतदारसंघात फुटीचा डाव यशस्वी करण्याच्या रणनीतीमुळे आढळराव यांना पराभवाला सामोरे जावे लागले मात्र एकेकाळी आढळराव यांच्याशी घनिष्ठ मैत्री असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसेपाटील यांनी लोकसभेसाठी पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असलेले डॉ कोल्हे यांना रिंगणात उतरविण्याची खेळी केली आणि ती यशस्वी करून दाखवली.

मात्र आजवर’ विधानसभेला तुम्ही मदत करायची आणि लोकसभेला आम्ही तुम्हाला साथ द्यायची ‘ हा ठरलेला ‘फार्म्युला’ यंदा बदलण्यात आला. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यासाठी वळसे यांचा बालेकिल्ला असलेल्या आंबेगाव मतदारसंघाला ‘टार्गेट’ करताना, लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने खेड, जुन्नर मतदारसंघात जी खेळी खेळली, तीच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीवर ‘आंबेगावा’त उलटवून द्यायची यासाठी आता आढळराव समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

लोकसभेच्या प्रचारात मतदारसंघासाठी स्वतः काय केले ? हे सांगण्याचे सोडून, त्या मोदीला पुन्हा पंतप्रधान करा म्हणून मते मागत आहेत, ज्यांनी आपल्या देशातील शेतकरयांना मरणासन्न करण्यासाठी पाकिस्तानातून कांदा, साखर आयात केली. शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र वाढवले इतकेच काय महागाई भडकवली, घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल दरवाढ लादली, शेतकरी, व्यापारी, कामगारवर्ग देशोधडीला लावण्याचे काम केले अशांसाठी तुम्ही मते मागत आहात तर तुम्ही खासदारकीची निवडणूक कशाला लढवत आहात ? या अनेक प्रश्नांचा भडीमार करून बैलगाडा शर्यत बंदीचा मुद्दा गाजवणाऱ्या राष्ट्रवादीला आता प्रत्युत्तर देण्यासाठी ‘राष्ट्रवादीच्या ‘माननीयां’नी काय केले ? आणि कसे केले ? कुणाचे हित जोपासले गेले ? या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून ‘जशास तसे’च्या धर्तीवर ‘पंचनामा’ करण्याची रणनीती सेनेने आखल्याची चर्चा उत्तर पुणे जिल्ह्यात आहे.

पाणी प्रश्न असो किंवा शेतीपूरक उद्योग, विद्यमानांनी त्यांच्या कारकीर्दीत काय -काय केले ? यावर भर देऊन राष्ट्रवादीला गारद करण्याची व्यूहरचना शिवसेनेने पर्यायाने आढळराव समर्थकांनी आखली असून ‘आंबेगाव’मध्ये राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी नाराजांना एकवटण्याची खेळीही सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात घडत आहे. परिणामी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात यंदा ‘पक्षांतराची लाट’ मोठ्याप्रमाणावर दिसणार असेही आता बोलले जात आहे.
आरोग्यविषयक वृत्त

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका