आंबेडकरांचे नातू आनंदराज यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाहीच ; ‘ते’ वृत्त खोटे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ही घटना केवळ अफवा ठरली आहे. आनंदराज यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशी माहिती सोशल मीडियामधून पसरवण्यात आली होती. मात्र ते वृत्त खोटे असल्याची माहिती मिळाली आहे.

आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच निवडणुकीच्या रिंगणातून दिल्लीतील पक्षाचे सातही उमेदवार मागे घेतले आहेत. अशा बातम्या सोशल मीडियामधून फिरत आहेत. मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आनंदराज आंबेडकर काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत हे वृत्त चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.

आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेना हा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत. आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीचे एक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. आनंदराज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, यशवंत आंबेडकरांचे पुत्र व प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू आहेत.