घराण्याची अब्रू वाचविण्यासाठी भाऊच आला पुढे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – घर छोटे असो की मोठे प्रत्येकाला आपल्या घराण्याविषयी अभिमान असतो. भावा भावात कितीही भांडणे झाली तरी घराची अब्रु जाऊ नये, म्हणून प्रसंगी भाऊच आपल्या भावाच्या मदतीला येतो, असे आजवर दिसून आले आहे. याची पुन्हा एकदा प्रचिती आली. भारतातील सर्वात श्रीमंत भावाने आपल्या कर्जबाजारी भावाला तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी मदतीचा हात दिला आणि त्याची तुरुंगवारी टाळली.

होय ! भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपला भाऊ अनिल अंबानी याला मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्सने एरिक्सन या स्वीडीश कंपनीला देय असलेली ४५८ कोटी रुपयांची रक्कम सोमवारी अदा केली. त्यामुळे कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची अटक टळली. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही आरकॉमने एरिक्सनचे देणे फेडले नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या न्यायालयाने अंबानी यांना ही रक्कम १९ मार्चपर्यंत भरण्याचे आदेश दिले होते. त्याच्या आदल्या दिवशी आरकॉमने हे पैसे अदा केले. त्यासाठी मदत केली ती मुकेश अंबानी यांनी.

याबाबत कंपनीने अधिकृतपणे काहीही कळविले नसले तरी अनिल अंबानी यांनी आपले बंधू मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे आभार मानले आहेत. ट्विटरवर अनिल अंबानी यांनी म्हटले आहे की, अडचणीच्या काळात मुकेश आणि नीता अंबानी यांनी वेळेवर पाठिंबा देऊन आपले कुटुंब मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे.