महायुती, शिवसेनेतील नाराज कार्यकर्ते राठोडांची डोकेदुखी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना महायुतीची उमेदवारी मिळाली आहे. मात्र पक्षांतर्गत नाराजी व भाजपमधील माजी खासदार गांधी व इतर नाराज कार्यकर्त्यांचा गट राठोड यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अन्यथा निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसू शकतो.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून अनिल राठोड विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. संग्राम जगताप निवडणूक लढवतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. वंचितकडून किरण काळे यांना उमेदवारी दिली आहे. आम्हाला राठोड चालणार नाही, अशी भूमिका माजी खासदार गांधी यांनी घेतली होती. मात्र राठोड यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे भाजपचा गांधी यांच्यासह एक गट नाराज आहे. तसेच शिवसेनेचे संभाजी कदम यांच्यासह काही नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. याचा मोठा फटका अनिल राठोड यांना बसू शकतो. त्यांची नाराजी दूर झाली नाही, तर मतविभागणीचा फायदा विरोधी उमेदवाराला मिळू शकतो.

अनिल राठोड हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते व पक्षाचे उपनेते आहेत. मात्र अनेक वर्षापासून पक्षाकडून नगर शहरातून तेच उमेदवार असल्याने शिवसेनेतील काही इच्छुक नाराज आहे. संभाजी कदम हे विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. दुसरीकडे भाजपाला नगरची जागा मिळावी, यासाठी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यात माजी खासदार दिलीप गांधी हे सर्वात आग्रही होते. हे नाराज कार्यकर्ते अनिल राठोड यांची डोकेदुखी ठरणार आहे.

Visit : policenama.com