पवना बंदीस्त जलवाहिनीबाबत भाजपची भूमिका दुटप्पी, अण्णा बनसोडेंकडून टीकास्त्र

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पवना बंदीस्त जलवाहिनीबाबत भाजपची भूमिका पिंपरी चिंचवडमध्ये एक आणि मावळात वेगळीच अशी दुटप्पी असल्याची टिका पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी येथे केली.

पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आज पिंपरीतील मिलिंदनगर, भाटनगर, पिंपरीगाव आदी भागात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत माजी आमदार बनसोडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी महापौर मंगलाताई कदम, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, प्रभाकर वाघेरे, जगन्नाथ साबळे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, उषाताई वाघेरे, निकिता कदम, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका मीनाताई नाणेकर, शांती सेन, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, शहराध्यक्ष विशाल वाकडकर, ज्येष्ठ कार्यकर्ते अमरजित यादव आदी सहभागी झाले होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल चिंचवडमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भामा-आसखेडच्या पाणी आरक्षणाला मुदतवाढ दिली आहे. पवना बंद जलवाहिनीचा प्रश्न चर्चेतून मार्गी लावला जाईल असे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना वाढत्या लोकसंख्येला भविष्यात पुरेसे पाणी मिळावे यासाठी पवना धरणातून थेट बंदिस्त जलवाहिनीने पाणी आणण्याची योजना आखण्यात आली. ही योजना पूर्ण झाल्यास शहरवासीयांची पाण्याची गरज ब-याच अंशी पूर्ण होईल. मात्र, या योजनेबाबत भाजपची भूमिका दुटप्पी आहे. पुणे जिल्ह्याचे सहपालकमंत्री व मावळचे आमदार बाळा भेगडे हे कोणत्याही परिस्थितीत ही योजना होणार नाही असे सांगतात आणि पिंपरी चिंचवडमधील भाजपचे स्थानिक नेते व मुख्यमंत्री ही योजना होणारच असे पिंपरी चिंचवडमध्ये सांगतात हा त्यांचा दुटप्पीपणा आहे, अशी टिका बनसोडे यांनी केली. राज्यात येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीला बहूमत द्या, शहराचे सर्व नागरी प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन यावेळी बनसोडे यांनी दिले.

Advt.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात बारकाईने लक्ष घालत. त्यामुळे प्रशासनावरही वचक होता. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर सगळा सावळा गोंधळ झाला आहे.

या पदयात्रेनंतर शुक्रवारच्या नमाजचे औचित्य साधत माजी आमदार बनसोडे यांनी पिंपरी मशिद रस्त्यावर मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रचार पत्रकांचे वाटपही करण्यात आले.

Visit : Policenama.com