एट्रीचा हप्ता घेणारा पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातून उपनगरात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टेम्पो, जीप चालकांकडून राज्यात सर्वत्र मासिक हप्ता घेतला जातो. पोलिसांच्या या राजरोसपणे चाललेल्या गोरख धंद्यांवर आजवर अनेकांनी केवळ टिका केली. परंतु, आपल्या धंद्यावर परिणाम होऊन पोटाचा प्रश्न हे पोलीस निर्माण करतील, म्हणून आजवर कोणी तक्रार करत नव्हते.

मासिक हप्त्याची रक्कम अतिशय कमी असल्याने सर्वच जण त्याकडे दुर्लक्ष करीत होते. नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका रिक्षाचालकाने धाडस दाखवून तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रिक्षाचालकाकडून ५०० रुपये मासिक हप्ता घेणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला सापळा रचून त्याला पकडले.पोलीस नाईक राजकुमार उदाराम (वय ४३, रा. एमआयडीसी झोन, वाहतूक शाखा, नागपूर) असे त्याचे नाव आहे.

नागपूर असो, की पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा मोठ्या शहरात शहराच्या एका टोकाकडून उपनगरात अथवा जवळच्या गावात जाण्यासाठी रिक्षाचालक, जीपचालक व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडून दर महिन्याला वाहतूक पोलीस, आरटीओ ठराविक रक्कम मासिक हप्ता म्हणून गोळा करते. अनेक ठिकाणी तर त्यांना पैसे दिले की विशिष्ट प्रकारचे कागदी कूपन दिले जाते. हे चालक महिन्याला हे कूपन घेतात.

महिन्याभरात कधी पोलिसांनी पकडले तर त्यांना ते कूपन दाखवले की पोलीस सोडून देतात. गोळा होणारी ही रक्कम अगदी गोळा करणाऱ्या पोलीस शिपायापासून निरीक्षक, एसीपी, डिसीपीपर्यंत जात असते. ही साखळी जवळपास सर्व राज्यभर दिसून येते. गेली अनेक वर्षे पोलीस आणि आरटीओचा गोरख धंदा राज्यभरात सुरु आहे. मात्र, त्यावर काहीही कारवाई होताना दिसत नाही.नागपूरमधील एका २१ वर्षाच्या रिक्षाचालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

सीताबर्डी ते हिंगणा अशी रिक्षा चालविण्यासाठी प्रत्येक महिन्याला या रिक्षाचालकाकडे एंट्री म्हणून ५०० रुपयांची लाच मागितली होती.या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोरख कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. या रिक्षाचालकाकडून राजकुमार उदाराम हे ५०० रुपये घेत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

नागपूर पोलिसांनी ५०० रुपये ही मामुली वाटणारी पण, हजारो, लाखो रिक्षा, जीप व्यवसायिकांना दर महिना द्यावा लागणाऱ्या लाचेवर कारवाई केली आहे. राज्यभरातील विविध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी, तसेच वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस आयुक्त हा गोरख धंदा कधी बंद करणार?असा प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित झाला आहे.

Visit : Policenama.com