३ हजार रुपयाची लाच स्विकारताना मनपामधील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – घरपट्टी कमी करून देण्यासाठी तीन हजाराची लाच स्विकारताना सांगली, मिरज आणि कुपवाडा मनपा कार्यालयातील घरपट्टी विभागातील लिपीकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (सोमवार) मिरज शहरातील कर्मवीर भाऊराव चौकात करण्यात आली. या कारवाईमुळे मनपामधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. नितीन भिमराव उत्तुरे असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या घराची मोजणी करण्यात आली होती. घराची घरपट्टी कमी आकारण्यासाठी नितीन उत्तुरे याने तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीमध्ये ३ हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुपचपत विभाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन पथकाने आज पडताळणी केली. पडताळणीमध्ये नितीन उत्तुरे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम कर्मवीर भाऊराव चौकत स्विकारण्याचे कबुल केले. पथकाने चौकामध्ये सापळा रचला. नितीन उत्तुरे याला तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपये स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधीक्षक बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, पोलीस कर्मचारी रविंद्र धुमाळ, जितेंद्र काळे, संजय संकपाळ, अविनाश सागर, भास्कर भोरे, राधीका माने, अश्विनी कुकडे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.