अर्जुन खोतकर भाजपच्या इच्छुकांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध आघाडी उघडणाऱ्या अर्जुन खोतकर यांचे समाधान करण्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. खोतकरांनी माघार घेतली. आता त्याच खोतकरांवर परभणीतील भाजपच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या मेघना बोर्डीकर यांची नाराजी दूर करण्याची कामगिरी सोपविली. मात्र अजूनपर्यंत तरी त्याला यश आलेले दिसत नाही.

बोर्डीकर परभणी लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक असून गेल्या तीन वर्षांपासून त्या लोकसभेची तयारी करत आहे. ज्याप्रमाणे अर्जुन खोतकर जालनामधून युती होणार नाही असे समजून तयारी करीत होते. तशीच परिस्थिती परभणीत दिसून येत आहे. पण युती झाल्याने बोर्डीकर आणि भाजप दोघांचीही अडचण झाली आहे. युतीच्या वाटाघाटीत परभणीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. इथून शिवसेनेचे संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत. युती झाली असताना मेघना बोर्डीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर थेट शिवसेनेला फटका बसणार आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेत्यांनी बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली.

परभणीत भाजपच्या मेघना बोर्डीकर मोठा निर्णय घेणार होत्या. त्या बंडखोरी करून लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत होत्या. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युतीकडून प्रयत्न झाले. मेघना बोर्डीकर नाराज असल्याने वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना खासदार संजय जाधव, परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी युतीच्या बैठकीचे आयोजन केले. यावेळी त्याही उपस्थित होत्या. परभणी शहरातील बोर्डीकरांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर मेघना बोर्डीकर आपल्या निर्णयवार ठाम राहिल्या.

दरम्यान, संजय जाधव युतीचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात मेघना बोर्डीकर रिंगणात उतरल्या तर मोठा पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते. ही शक्यता घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुढील चर्चेसाठी २२ मार्चला मुंबईला बोलावले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like