अखेर अर्जुन खोतकरांची ‘या’ कारणामुळे माघार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जालना लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला आहे. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात दिलजमाई झाली आहे. युतीच्या भल्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे. औरंगाबाद येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र शिवसेना – भाजपा युतीच्या जालना लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटत नसल्याचे दिसून येत होते, याचदरम्यान आज शिवसेना भाजप युतीचा दुसरा मेळावा औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्याच्या आधी रामा हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक होणार होती. या बैठकी मध्ये जालन्याच्या जागेवर तोडगा निघणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्याचप्रमाणे या बैठकीत तोडगा निघाला आहे. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात दिलजमाई करण्यात युतीला यश आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. युतीच्या भल्यासाठी मी लोकसभा रिंगणातून माघार घेतली आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

इतकेच नव्हे तर, मी कडवट शिवसैनिक दगाफ़टका करणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी युतीचा धर्म समजून सांगितला मी स्वतः लोकसभा निवडणुकीत युतीची सत्ता यावी म्हणून, रावसाहेब दानवेंचा प्रचार करणार आहे, असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, जालन्याच्या जागेचा तिढा संपवण्यासाठी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक पार पडली हाती. मात्र त्या बैठकीतही कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समोर आले होते.