स्वत:च दुरुस्त होईल कृत्रिम इलेक्ट्रॉनिक त्वचा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जेलीफिशपासून प्रेरित होऊन एक खास प्रकारची कृत्रिम इलेक्ट्रॉनिक त्वचा बनविण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळविले आहे. या त्वचेमध्ये सेल्फ हीलिंग म्हणजे स्वत:हून दुरुस्त होण्याची क्षमता आहे. तिला खरचटले तरी त्याचे व्रण ती स्वत:च भरू शकेल.

या त्वचेच्या मदतीने वॉटर रेजिस्टंट टच्क्रिरनपासून पाण्यात तरंगण्यास सक्षम असलेले विविध प्रकारचे रोबोट तयार केले जाऊ शकतील. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांनी त्यासाठी एक खास प्रकारचा पदार्थ तयार केला आहे. तो जेलीफिशप्रमाणेच पाण्यात आपल्या जखम स्वत:च बऱ्या करण्यास सक्षम आहे. या अध्ययनाचे प्रमुख बेंजामिन टी यांनी सांगितले की, सध्या जेवढे सेल्फ हीलिंग पदार्थ आहेत, ते पारदर्शक नाहीत व पाण्यात योग्यप्रकारे काम करत नाहीत. या उणिवांमुळे त्यांचा ओलसर जागी वापरण्यासाठी बनविल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी वापर केला जात नाही.

शास्त्रज्ञांनी एक फ्लोरोकार्बन आधारित पॉलीमरयुक्त जेल आणि फ्लोरीनचे जास्त प्रमाण असलेल्या द्रवाच्या मदतीने हा खास पदार्थ बनविण्यात यश मिळविले आहे. थ्रीडी प्रिंटिंगमध्येही या पदार्थाचा वापर केला जाऊ शकतो. याच वैशिष्ट्यामुळे त्यापासून पारदर्शक सर्किट बोर्ड बनविणेही शक्य होऊ शकेल. या पदार्थाच्या मदतीने विविध प्रकारचे सॉफ्ट रोबोट बनविता येतील. मानवी उतींप्रमाणे काम करण्यास सक्षम असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सला साधारणपणे सॉफ्ट रोबोट म्हटले जाते. कृत्रिम अवयव बनविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते.