अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : सत्र न्यायाधीशांनी स्वतःहून खटला सोडला

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात सुरु आहे. न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्याकडे हा खटला सुरु होता. मात्र, आता राजेश अस्मर यांनी हा खटला स्वतःहून सोडला आहे. त्यामुळे आता हा खटला न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या न्यायालयात चालणार आहे. न्यायमूर्ती राजेश अस्मर व आरोपी अभय कुरुंदकरचे वकील विशाल भानुशाली यांची ज्युनियरशिप एकाच ठिकाणी झाल्याचे सांगत अश्विनी यांच्या पतीने साक्ष देण्यास नकार दिला होता.

अश्विनी बिद्रे खून खटला सुरुवातीला अलिबाग सत्र न्यायालयात सुरु होता. मात्र नंतर तो पनवेल सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला. मुख्य साक्षीदार आनंद बिद्रे यांची सरतपासणी आणि उलटतपासणी झाली. त्यानंतर दुसरे साक्षीदार अश्विनी यांच्या पतीची तपासणी सुरु होणार होती. मात्र त्यांनी साक्ष देण्यास नकार दिल्यानंतर राजेश अस्मर हे या खटल्यातून बाजूला झाले आहेत. न्यायाधीश आणि आरोपीचे वकील भानुशाली यांची ज्युनियरशीप अ‍ॅड. गजानन चव्हाण यांच्याकडे झाली असल्याने साक्ष देण्यास अश्विनीच्या पतीने नकार दिला.

पनवेल न्यायालयाचे सत्र न्यायाधीश राजेश अस्मर आणि आरोपीचे वकील विशाल भानुशाली हे एकाच चेंबरचे आहेत. मात्र त्यांनी एकत्र काम केलेले नाही. ज्यावेळी अस्मर यांनी ज्युनियरशिप सोडली त्यावेळी भानुशाली हे पदवीधर पण झाले नव्हते. त्या दोघांमध्ये सहा वर्षाचा फरक आहे. या खटल्याचे कामकाज लांबणीवर टाकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप होत असल्याचे अ‍ॅड. गजानन चव्हाण यांनी म्हटले.