बंडोबांना ‘थंड’ करण्यासाठी उरले काही तास, प्रचाराऐवजी विनविण्यात जाणार अख्खा दिवस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा आणि शिवसेनेने केलेल्या युतीमुळे अनेकांचे मनसुबे फिसकटल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. महायुतीसमोर राज्यात ११४ ठिकाणी बंडखोरी झाली असून या बंडोबाना शांत करण्यासाठी आता काही तासच उरले आहे. ७ ऑक्टोंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रविवारी दिवसभर बंडोबांना फोन करुन त्यांना कधी विनवणी तर, कधी आश्वासने देऊन माघार घेण्यास सांगत होते. तो ऐकायला तयार नसेल तर त्याला पुढील भविष्यात काय होऊ शकेल, याची जाणीव कडक शब्दात करुन दिली जात होती. चंद्रपूर वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीबरोबरच आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आपल्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची वरिष्ठांमार्फत माघारीसाठी प्रयत्न करीत होते. आज अखेरच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

मातोश्री वरुनही बंडखोरांशी संपर्क साधण्यात येत होता. शिवसेनेने सर्व २८८ जागांसाठी तयारी केली होती. त्यामुळे अनेकांनी निवडणुक लढविण्याच्या दृष्टीने सर्व तयारी केली होती. अचानक युती झाल्याने अनेक इच्छुकांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे नाराजांनी बंडखोरी करीत अर्ज भरला आहे. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न रविवारी दिवसभर सुरु होता.

अनेक ठिकाणी शिवसेनेविरोधात भाजपाचे उमेदवार उभे असून काही ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध शिवसैनिकांनी बंडखोरी केली आहे. त्याचबरोबर भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात त्यांच्याच पक्षातील इच्छुकाने बंडखोरी केली आहे. मेगा भरतीत भाजपा शिवसेनेत गेलेल्यांना या दोन्ही पक्षांनी भरभरुन तिकीटे दिल्याने प्रामुख्याने या उमेदवारांविरोधात बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी विद्यमान आमदारांची तिकीटे कापली गेली. त्यांनी पक्षाविरोधात झेंडा उभारला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीलाही बंडखोरीने सोडले नाही. वांद्रे पूर्व मधून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पैकी चार ठिकाणी बंडखोरी झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. कणकवलीत भाजपाचे नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे सतीश सावंत, सावंतवाडीत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपाचे राजन तेली यांनी आव्हान दिले आहे. उरणमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांच्याविरोधात भाजपानेते महेश बाल्डी, माणमध्ये भाजपाचे जयकुमार गोरे यांच्या विरोधात शेखर गोर यांची बंडखोरी. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार यांनी आव्हान दिले आहे.

देवळीमध्ये शिवसेनेने सलील देशमुख यांना उमेदवारी दिल्याने भाजपाच्या बकाणे यांनी अर्ज दाखल केला आहे. कागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांनी बंडखोरी केली आहे.

Visit : Policenama.com