विधानसभेची ‘लगीनघाई’ ; इच्छुकांना तारणार ‘उषा सिलाई स्कूल’ !

सिंधुदुर्ग : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत पराभवाचे शल्य अनेकांना अजूनही असताना आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी व्यूहरचना आखण्यास प्रारंभ केला आहे. त्यातही लोकसभा निवडणुकीत महिला आणि युवक वर्गाने मोदींना भरभरून मते दिल्याच्या पार्श्वभूमीवर महिला शक्ती आपल्या मागे एकवटविण्यासाठी आता दिग्गज इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे महिलांना शिलाईचे शिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवणारे ‘उषा सिलाई स्कूल’ हा उषा मशीनचा सेवाभावी प्रकल्प आता इच्छुकांना आधारवड ठरणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांना शिलाई चे शिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवणारे ‘उषा सिलाई स्कूल’ हा उषा मशीन चा सेवाभावी प्रकल्प ,कणकवली विधानसभा मतदारसंघात लवकरच सुरू करणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे . आमदार नितेश राणे यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात विविध प्रकल्प राबवून नाविन्यपूर्ण योजना आणल्या व विविध उपक्रम राबवले.

महिलांना स्वयंपूर्ण होता यावे यासाठी ग्रामीण भागात उषा शिलाई मशीन उषा शिलाई स्कूल नावाचा प्रकल्प सुरू केला आहे, हा प्रकल्प देवगड वैभववाडी व कणकवलीच्या ग्रामीण भागात सुरू करण्याचा मानस आमदार नितेश राणे यांनी जाहीर केला आहे. यानुसार पॅन्ट शर्ट व विविध कपडे कापायचे कसे व शिवायचे कसे याचे संपूर्ण ट्रेनिंग महिलांना दिले जाणार आहे. यामुळे महिला स्वयंपूर्ण होतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी ट्विट द्वारे व्यक्त केला आहे.