फक्त ‘तिकीट’… थेट आमदार ; इच्छुक आता जोमात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन [ विश्लेषण ] – लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता एकहाती हस्तगत करणाऱ्या भाजपच्या वर्तुळात आता उत्साहाचे वातावरण आहे.त्यात आगामी विधानसभा निवडणुकीत केवळ ‘तिकीट’ मिळाले तरी ‘आमदारकी’चा मार्ग सहजरित्या साध्य होणार आहे. त्यामुळे पुण्यात आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच काय शिवसेनेतील इच्छुकांनी आतापासून ‘ फिल्डिंग ‘ लावण्यास जोरदार सुरुवात केली आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीत गतवेळी भरघोस मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या भाजपने यंदाही मतांचा विक्रम मोडला आहे. भाजप – महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी मोठे मताधिक्य घेत विजयाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या गोटात इच्छुकांनी जोरदार तयारी चालवली आहे. मात्र पक्ष कुणाला संधी देईल यापेक्षा आपले नाव कसे अग्रभागी येईल यासाठी ‘बेरजेचे राजकारण ‘ सुरु झाले आहे.

गत विधानसभा निवडणुकीत आठही विधानसभा मतदारसंघात भाजपने घवघवीत यश प्राप्त केले होते. मात्र पक्षातंर्गत यंदा या आठही मतदारसंघात रस्सीखेच सुरु असली तरी यंदा लोकसभा निवडणुकीपूर्वीच युती धर्म पाळण्याचे ठरले आहे,  त्यामुळे जागावाटपाचे समीकरण कसे असेल याचा अंदाज घेऊन या आठही मतदारसंघात युतीमधील इच्छुकांनी तिकीट कसे मिळेल यासाठी चाचपणी सुरु केली असून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ‘ फिल्डिंग ‘ लावण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत फक्त ‘तिकीट ‘ मिळाले तरी विजय निश्चित आहे, हे गृहीत धरून इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यात सध्या असलेल्या विद्यमान आमदारांचा पत्ता कसा कट होईल यासाठी छुपे लॉबिंगही सुरु केले आहे. त्यात मध्यंतरी भाजपच्या श्रेष्ठीनी केलेल्या ‘रिपोर्टकार्ड’चा आधार घेऊन नवे समीकरण काय असेल याचा अंदाजही बांधला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघात ‘भाऊ’ खासदार झाल्याने अनेक वर्षे आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुकांनी आता जय्यत तयारी चालवली आहे मात्र खासदार गिरीश बापट हेच इथला उत्तराधिकारी ठरविणार आहेत. या मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे याबरोबरच पक्षांतर्गत नाराजी दर्शविणारे ; पण ‘सीएम’शी जवळीक असणारेही इच्छुक आहेत. त्यात बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांचे नावही समर्थकांनी लावून धरले आहे. त्यामुळे इथून तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांची मोठी धडपड होणार आहे.

शिवाजीनगर मतदारसंघातून आपल्याला कशी संधी मिळेल याची गृहीतके मांडताना इच्छुकांना हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला येतो का याकडेही लक्ष आहे . असे असले तरी येथून सिद्धार्थ शिरोळे , बाळासाहेब अमराळे यांच्याबरोबर ऐनवेळी एक निवृत्त होणारा आयपीएस अधिकारीही इच्छुक असल्याचे बोलले जात आहे त्यात या मतदारसंघात भाजप असो किंवा शिवसेना ज्यांच्या वाट्याला हा मतदारसंघ जाईल त्यानुसार एक दिग्गज घराणे येथून आमदार होण्यास इच्छुक आहे. विशेष म्हणजे स्थानिक असो किंवा शहर ,राज्य अगदी देशपातळीवर या घराण्याचे सर्वांशी चांगले संबंध आहेत,त्यांना जमेची बाजू असल्याचे बोलले जात आहे. सेनेकडून राजू पवार हेही फिल्डिंग लावतील. त्याचबरोबर माजी आमदार विनायक निम्हण यांची भूमिका महत्वपूर्ण असेल.

कोथरूड मतदारसंघावर प्रा. मेधा कुलकर्णी यांनी भाजपचा मतदारसंघ हा दावा भक्कम केला आहे ,त्यात त्यांचे रिपोर्ट कार्ड चांगले आहे. मात्र हा मतदारसंघ आमच्या वाट्याला यावा यासाठी शिवसेना जागावाटपात आक्रमक राहील असे असले तरी येथून आमदार प्रा. मेधा कुलकर्णी या पुन्हा संधी मिळविण्यासाठी दिल्लीत मोर्चेबांधणी करतील मात्र येथून भाजपचा युवा चेहरा असलेले स्थायीसमितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हेही इच्छुक आहे. तर सेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शाम देशपांडे हेही दावेदार राहतील. कोथरूड विकास परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झालेले आशिष कांटे हेही फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे. याव्यतिरिक्त खासदार नाना काकडे यांचे काही समर्थकही तसेच नवे चेहरे इथून तिकीट मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून सेनेतील इच्छुकांना आता पुन्हा सुवर्णसंधी लाभली आहे. हा मतदारसंघ जागावाटपात आपल्याकडे कसा येईल यासाठी सेनेचे इच्छुक कार्यरत झाले आहेत. विशेष म्हणजे हा मतदारसंघ कुणाला जातो यानुसार येथून अनेक दिग्गज पक्षांतरासाठी तयार आहेत. विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्यावर झालेल्या आरोपांचे आधार घेत वातावरण निर्मिती करून जर भाजपला हा मतदारसंघ गेला तर यासाठी ‘ भाऊकी’चे राजकारणही सुरु झाले आहे. मनसेतील अनेक जण येथून इच्छुक आहेत. वडगावशेरी हा मतदारसंघ अनेक इच्छुकांना खुणावत आहे. त्यात विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना डावलून कसे तिकीट मिळेल यासाठी या भागातील दिग्गजांनी ‘वरच्या पातळी’वर संपर्क सुरु केला आहे तर राष्ट्रवादीतील मात्र ‘इलेक्टिव्ह मेरिट ‘असणारेही सहजरित्या आमदारकी मिळविण्यासाठी भाजप किंवा सेनेत ऐनवेळी प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला जाऊ शकतो त्यामुळे इथून सेनेकडून गेली अनेक वर्षे निष्ठावंत असणारे फिल्डिंग लावून आहेत तर व्यावसायिक भागीदार असणारे एकमेकांना साहाय्य करण्यासाठी ‘तजवीज ‘ करण्याच्या तयारीत आहेत.

‘पर्वती’तत आमदार माधुरी मिसाळ यांना डावलून कसे तिकीट मिळेल यासाठी काहींनी भाजपच्या अंतर्गत गोटात फुटीचा डाव मांडला आहे. येथून इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यात पूर्वाश्रमीचे सेनेचे असलेले काही जण पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.

‘खडकवासला’मधून इच्छुकांची संख्या मोठी आहे मात्र हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो यापेक्षा भाजप असो किंवा सेना भाऊकीच्या जोरावर येथून तिकीट मिळविण्यासाठी आटापिटा सुरु आहे. ‘कॅंटोन्मेंट’मधून इच्छुकांची स्पर्धा रंगणार आहे. कारण या मतदारसंघातून सहजरित्या आमदारकीचा मार्ग हे ‘ गणित ‘ सहज साध्य आहे . या आठही मतदारसंघात फक्त उमेदवारी हाच आमदार होण्याचा निकष असणार आहे हे गृहीत धरून इच्छुक जोमाने कामाला लागले आहेत.