CM च्या PA ला उमेदवारी, लातूरच्या औसात भाजपा कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेली काही महिने चर्चेत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पी ए अभिमन्यू पवार यांना भाजपाच्या पहिल्या यादीत औसा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने एकच गोंधळ माजला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी औसा येथे रास्ता रोको आंदोलन करुन आपल्या असंतोषाला वाट करुन दिली आहे. पालकमंत्री रणजित निलंगेकर पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवार निवडणुक लढविणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. तेथून १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेचे दिनकर माने हे विजयी झाले होते. हा अपवाद वगळता आजपर्यंत औसा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. सध्या तेथे काँग्रेसचे बसवराव पाटील हे आमदार आहेत.

औसा मतदारसंघातून संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधु अरविंद निलंगेकर हे इच्छुक होते. शिवसेना हा मतदारसंघ सोडायला तयार नव्हती. असे असताना केवळ आपल्या स्विय सचिवासाठी मुख्यमंत्र्यांनी तो भाजपाकडे घेतला. अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी औसा लातूर रोडवर रस्ता रोको केला. त्याचवेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे निलंगाकडे जात होते. त्यांची गाडी रोखण्यात आली व त्यांना कार्यकर्त्यांनी जाब विचारला. तेव्हा पालकमंत्रीही अंधारात असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना बोलताना आपल्या भावना अनावर झाल्या. अभिमन्यू पवार यांच्या रुपाने जिल्ह्यात थेट पक्षात प्रतिस्पर्धी तयार होत असल्याने त्यांनीही कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन देण्याची संधी साधली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अभिमन्यू पवार करणार सीएम, प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार

औसा, लातूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या उद्वेगामुळे अभिमन्यू पवारही अस्वस्थ झाले असून त्यांनी आपल्याला विरोध करणाऱ्यांची मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. निवडणुकीत तिकीट मिळेपर्यंत स्पर्धा करणे मी समजू शकतो. पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यावर पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करणे अपेक्षित आहे. आपण उपरा नसून आपल्या आजोबांपासून आम्ही आरएसएस शी संबंधित असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

Visit : Policenama.com