..असे मिळेल साकळाई योजनेला पाणी! : माजी मंत्री बबनराव पाचपुते

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळ्यात कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांना जाणारे पावणेदोन टीएमसी पाणी कुकडी प्रकल्पात वळवून साकळाई योजनेला पाणी उपलब्ध करून देता येईल. त्यासाठी राज्य शासनाने सर्व्हे करण्यासाठी मंजुरीही दिली आहे, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पाचपुते म्हणाले की, सकारात्मक कामे करणाऱ्या सरकारबाबत सध्याचे लोकप्रतिनिधी नकारात्मक घंटा वाजवत आहेत. कुकडी प्रकल्पातून साकाळाई योजनेसाठी पाणी उपलब्ध करून देता येणे शक्य नाही, हे माहिती असूनही त्यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला. परंतु प्रश्नावर तोडगा काढण्याचा विचार केला नाही. पावसाळ्यामध्ये पश्चिम वाहिनी नदीकडे कोकणात जाणारे पाणी अडवून ते कुकडी प्रकल्पात वळविल्यास पावणेदोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. ते पाणी साकळाई योजनेसाठी वापरता येईल, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनीही सर्व्हे करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर साकळाई येण्याचा प्रश्न मार्गी लागेल.

सरकारकडून कुकडी प्रकल्पातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. डिंबे बोगद्याचा प्रश्नही निकालात निघेल. राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली आहे, असेही पाचपुते म्हणाले.