बारामतीत राष्ट्रवादी Vs भाजप, कोणाचे पारडे जड ; जाणून घ्या काय असू शकतो निकाल ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती मतदार संघ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महत्वाचा मनाला जाणारा मतदार संघ आहे. या मतदार संघाच्या निकालाकडे केवळ राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष्य लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समाजल्या जाणाऱ्या या मतदार संघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. यंदा बारामती मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपकडून पहिल्यांदाच स्थानिक उमेदवार जाहीर करीत कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे Vs कांचन कुल चुरस रंगणार

यंदाच्या निवडणुकांमध्ये या मतदार संघात काटे की टक्कर होणार असे मानले जात आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्यासारख्या राजकीय वारसा असलेल्या उमेदवार तर दुसरीकडे भाजपकडून स्थानिक उमेदवार कांचन कुल अशी लढत रंगणार आहे. भाजपने राहुल यांच्या पत्नी कांचन यांना उमेदवारी देत बारामतीतून पुन्हा पवार कुटुंबासमोर आव्हान उभे केले आहे.

मोदींची सभा न झाल्याचा भाजपला फटका ?

भाजपच्या उमेदवार कुल यांच्याकडे यंदाच्या निवडणुकीत ‘ब्रॅन्ड मोदी’ हा प्लस पॉईंट आहे. सध्या देशात मोदी या नावाची मोठी चर्चा आहे. मोदी समर्थकांचे लक्ष्य केवळ देशात मोदी सरकार स्थापन करणे आहे. त्यामुळे जरी मतदार संघातील उमेदवार तितका दमदार नसला तरी केवळ मोदींना जिंकून आणायचे आहे म्हणून भाजपाला मत देणाऱ्यांची संख्या कमी नाही. याचाच फायदा कुल यांना होऊ शकतो. असे देखील बोलले जात आहे.

वर्धा येथे मोदींची सभा झाली यात त्यांनी पवार कुटुंबाच्या घराणेशाही विरोधात जोरदार टीका केली होती. त्यानंतर बारामती मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा होणार होती. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासंदर्भातल्या बातम्या देखील प्रसार माध्यमातून झळकल्या होत्या. मात्र बारामती येथे मोदींची सभा झाली नाही. याचा फटका भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना बसू शकतो. असे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आज माढा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बोलण्याचा रोख पाहता ही सभा बारामतीतच चालू आहे की काय असे भासत होते. या सभेत शरद पवार यांना पुन्हा एकदा घराणेशाहीवरुन टीकेचे लक्ष्य केले.

सुप्रिया सुळेंना मित्रपक्षाची साथ

मागील विधासभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. मात्र, यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केल्यामुळे मित्रपक्ष आघाडीला निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत. विधानसभेला एकमेकांच्या विरोधात असणारे अजित पवार, हर्षवर्धन पाटील हे देखील या मतदार संघात आघाडीला निवडून आणण्यासाठी ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ अशा रीतीने कामाला लागले आहेत.

एकूणच बारामती मतदार संघात लोकसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत चुरस रंगणार आहे. या मतरदार संघात सुप्रिया सुळे बाजी मारणार असे भाकीत राजकीय विश्लेषकांनी वर्तवले आहे. बारामतीत राष्ट्रवादीचे पारडे जड असले तरी भाजप देखील त्यांना तगडी टक्कर देणार यात शंका नाही.

बारामती लोकसभा मतदार संघ

एकूण मतदार – १६,२७,३४७

स्त्री मतदार – ७,६८,७०६

पुरुष मतदार – ८,५८,६४१