भंडारदरा परिसरात पर्यटकांना ‘भुरळ’ घालणारी काजव्यांची ‘चमचम’ सुरू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भंडारदरा परिसरात दरवर्षी राज्यातील निसर्गप्रेमी पर्यटकांना भुरळ घालणारी काजव्यांची ‘चमचम’ सुरू झाली आहे. दोन दिवसांपासून काजवे चमकू लागल्याने आठवड्यात पावसाचे आगमनाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात गर्दी सुरू झाली आहे.

भंडारदरा परिसरातील अभयारण्य म्हणजे निसर्ग व जैव विविधतेचा मोठा खजिना आहे. दरवर्षी अभयारण्यात वैशाख महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे २५ मे ते १५ जून या कालावधीत हे काजवे दिसतात. यंदा मात्र पावसाचे आगमन उशिरा असल्याने त्यांचे दर्शन दोन दिवसांपासून होत आहे. कुमशेत, पांजरे, उडदावणे परिसरात सध्या ते कमी संख्येने दिसत असले तरी पुढील पाच सहा दिवसांत त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. हे काजवे सादडा, हिरडा, बेहडा, बोंडारा या वृक्षावरच दिसतात. कारण त्यांची साल खडबडीत व काजव्यांच्या प्रजननासाठी पूरक असते.

नरमादी एकमेकांना आकर्षित करतात. त्यांच्या शेपटीकडील भाग पाऱ्यासारख्या द्रवाने चमकतो. हा द्रव फक्त महिनाभर त्यांच्या शरिरात तयार होतो. नंतर याच वृक्षात ते आपली अंडी व पिलांना जन्म देतात.