धक्कादायक माहिती उजेडात ! आई-वडिलांनी गळा दाबून केला तीन मुलांचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – भोसरीत रविवारी घडलेल्या या प्रकरणाला दुसऱ्या दिवशी वेगळीच कलाटणी मिळाली आहे. आर्थिक चणचण जाणवत असल्याने पतीने बनाव करुन पत्नीच्या मदतीने स्वत:च्या दोन मुली आणि मुलाला गळा दाबून मारले. त्यानंतर पत्नीला आत्महत्या करायला भाग पाडले. मात्र वडिलांनी मुलींचा गळा दाबण्यापूर्वी दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पती-पत्नीवर खून, बलात्कार, बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे.

पोटच्या नऊ व सात वर्षांच्या दोन मुली आणि सहा वर्षांच्या मुलाला नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास देऊन आईने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी (२८ जुलै) उघडकीस आले होते. यावेळी पती कामधंद्याच्या शोधासाठी घराबाहेर पडला होता. तो परत आल्यावर त्याने घरमालकाच्या मदतीने पोलिसांना बोलावून घराचे दार तोडले. तेव्हा तिन्ही मुले एकाच हुकला नॉयलॉन दोरीने लटकलेल्या अवस्थेत होते. तर पत्नी आतील खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. परंतु, शवविच्छेदन अहवालात दोन्ही मुलींवर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. तसेच तिन्ही मुलांना प्रथम गळा दाबून मारले व नंतर लटकवले हे देखील उघड झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरवात केली.

आर्थिक चणचण असलेले हे कुटुंब चारच दिवसांपूर्वी भोसरीत राहण्यासाठी आले होते. आर्थिक चणचण असल्याने मुलांना मारून आपण आत्महत्या करू, असे पतीने पत्नीला सांगितले. तिन्ही मुलांना दोघांनी मारल्यानंतर पती घराबाहेर पडला. मी घराबाहेर जाऊन आत्महत्या करतो, असे त्याने पत्नीला सांगितले. त्यामुळे पत्नीने आतून कडी लावून घेत दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. शवविच्छेदन अहवालानंतर सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी फिर्याद दिली असून, वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे तपास करीत आहेत.