आता ‘राजधानी’ दिल्‍ली ‘सर’ करण्याचे भाजपाचे ‘लक्ष्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात विजयाचा मेरु जोरदार धावत असताना भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना एक शल्य नेहमीच सलत आले आहे. ते म्हणजे जेथून संपूर्ण देशाचे राजकारण चालते, त्या दिल्लीत आपले राज्य सरकार नाही. लोकसभा निवडणुकीतील दमदार विजयाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत ‘राजधानी’ सर करण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे.

२०१५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकून भाजपचा पराभव केला होता. तथापि, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीपेक्षा भाजपला ६७ मतदारसंघांत जास्त मते मिळाली होती. त्यामुळे दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप विजयी होईल, अशी आशा भाजप नेते बाळगून आहेत. दोन दशकांपासून भाजप दिल्लीतील सत्तेपासून दूर आहे. मोदींची लोकप्रियता कायम आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव ओसरला आहे, तेव्हा यावेळी भाजप निश्चित विजयी होईल अशी आशा आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

त्यासाठी राजकीय मुद्दे आणि चांगल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी अनेक सर्व्हे करण्याचा भाजपचा बेत आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. भाजप अनेक आघाड्यांवर काम करीत आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीत राजधानी दिल्लीत मिळालेली ५५ टक्के मते पुन्हा मिळवीत पुढल्या वर्षी होणारी दिल्ली विधानसभेची निवडणूक आरामात जिंकता येईल.

अलीकडेच पार पडलेल्या दिल्ली भाजप नेत्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपच्या पारड्यात पडलेली ५५ टक्के मते विधासभा निवडणुकीत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, असे भाजपचे संघटन सचिव सिद्धार्थन यांनी सांगितले. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसोबतच दिल्ली विधानसभेची निवडणूक मुदतीआधी होण्याची शक्यता विचारात घेऊन भाजपने बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघनिहाय विशेष मुद्दे ठरविणे, भाजप आमदारांसोबत दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारच्या कामगिरीचे आकलन करणे आणि योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी नेत्यांच्या लोकप्रियतेचे विश्लेषण करण्यासाठी तीन टप्प्यांत सर्वेक्षण करण्याचा भाजपचा बेत आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

वेगवेगळ्या वस्त्यांत रात्री मुक्काम करून तेथील लोकांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी अनधिकृत वस्त्या आणि झोपडपट्ट्यांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत, असेही त्या नेत्याने सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

 ‘सेक्स पॉवर’ जागृत करण्‍यासाठी करा योगासने

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर 

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू 

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका