..तर कांचन कुल यांचा प्रचार करणार नाही ; दौंडमध्ये शिवसेनेचा इशारा

दौंड – पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती असताना पुणे जिल्ह्यातील काही लोकसभा मतदार संघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना उमेदवारांना सहकार्य केले जात नाही असा आरोप दौंड तालुका शिवसेनेने केला असून जर आमच्या उमेदवारांना तुम्ही सहकार्य केले नाही तर दौंडमध्ये भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार करणार नाही असा इशारा चौफुला येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीत देण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार उभे आहेत. मात्र शिरूर आणि मावळ येथे भाजपचे शिवसेनेला सहकार्य मिळत नाही असा आरोप या बैठकीत करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते दौंडमध्ये भाजपला सहकार्य करणार नाहीत असा पवित्रा शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतला आहे. यावेळी शिवसेनेच्यावतीने प्रसिद्धीपत्रक काढण्यात येऊन त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात भाजपचे आमदार महेश लांडगे काम करीत आहेत. तर मावळमध्ये आमदार लक्ष्मण जगताप आपल्या समर्थक नगरसेवकांसह विरोधी भूमिका पार पाडत आहेत. या विरोधी भूमिकेचा निषेध करीत आहोत. मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवाराला सहकार्य करीत नाही तो पर्यंत दौंड शिवसेना कांचन कुल यांचा प्रचार करणार नाही. असे नमूद करण्यात आले आहे.

चौफुला येथे पार पडलेल्या या बैठकीला शिवसेनेचे दौंड विधानसभा संपर्क प्रमुख संजीव शिरोडकर, उपजिल्हा प्रमुख महेश पासलकर, तालुका प्रमुख अनिल सोनवणे, नीलेश मेमाणे, सदाशिव लकडे, राजेंद्र मासाळ, चंद्रकांत पिसे, ताहेर शिकिलकर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.