दर्शनाला देवळात जावू नका, ‘मी देव आहे’ : भाजपच्या उमेदवाराचे वादग्रस्त विधान

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या नेत्यांनी मोदींना विष्णूचा आवतार म्हटले होते. आता सोलापूरचे भाजपचे उमेदवार डॉ. जय सिद्धेश्वर यांनी ‘बोलणारा देव मी आहे’ असे वदग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता भाजप देवांचा पक्ष झाला की काय असा प्रश्न पडला तर नवल वाटायला नको. डॉ. जय सिद्धेश्वर यांनी प्रचारादरम्यान हे वादग्रस्त विधान केले आहे.

‘देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही. देव दर्शनासाठी तुम्ही गेलात तरी देव तिथे तुम्हाला भेटणार नाही. जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही. बोललाच तर आलास त्या पावली परत जा म्हणेल. तुमचे पैसे खर्च होतील पण तुम्हाला समाधान मिळणार नाही. कोठेही जावा, तुळजापूरला जावा, पंढरपूरला जावा मात्र तुम्हाला देव भेटणार नाही, बोलणारही नाही. बोलणारा देव मी आहे’, असे वादग्रस्त विधान जय सिद्धेश्वर यांनी केले आहे.

भाजपाने सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळेस पक्षाचे विद्यमान खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांचे तिकीट कापून गौडगावचे (ता. अक्कलकोट) डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली आहे. शिवाचार्य हे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यातच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही सोलापूरमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. डॉ. जयसिद्धेश्वर यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.