‘फिर एक बार’ की ‘बस कर यार’ ; आज सायंकाळी स्पष्ट होणार ‘चित्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणुक आयोग हात जोडून उभा आहे. संपूर्ण मिडिया पायाशी लीन झाला आहे. सत्ता, संपत्ती पायाशी लोळण घालत आहे. त्याच्याबरोबर जिंकण्यासाठी काहीही करायची तयारी व त्याचा पुरेपूर वापर करुन विरोधकांना हैराण करण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतरही भाजपाला संपूर्ण बहुमत मिळणार नसल्याचे चित्र सध्या नवी दिल्लीत चर्चिले जात असून त्यातूनच विरोधकांनी उचल खाल्ली आहे. सायंकाळी एक्झिट पोलवरुन हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

भाजपा च्या दाव्यानुसार त्यांचे सरकार पुन्हा आले तर ‘फिर एक बार’ घोषणा लोकांच्या पसंतीस पडली असे म्हणता येईल. मात्र, आता जे चित्र आहे अथवा जे चित्र उभे केले ते पाहता भाजपा व त्यांच्या आघाडीला बहुमत मिळणार नाही, असे वातावरण दिल्लीत आहे. शहरी मतदारांनी मोदींकडे पाठ फिरविली असून ग्रामीण भागातही भाजपाच्या प्रचाराला प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जाते. आज जे चित्र उभे राहिले आहेत, तसाच निकाल लागला तर नेहमीप्रमाणे मतदारांनी भाजपला दुसरी पारी न देता, मोदींच्या प्रचाराला न भुलता, मोदी यांना ‘बस कर यार’ असा संदेश दिला, असे म्हणावे लागेल.

२००४ मध्येही भाजपाने ‘इंडिया शायनिंग’ अशी प्रचंड मोठी प्रचार मोहिम राबविली होती. मात्र, त्याला मतदार भुलले नाहीत. त्यांनी भाजपाचा पराभव केला. त्यानंतर सलग १० वर्ष काँग्रेस आघाडीचे सरकार होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात नरेंद्र मोदी आणि भाजपाने राबविलेली मोहीम आणि त्यावर सिंग याची साधलेली चुप्पी यामुळे मोदींचा प्रचार ‘अब की बार मोदी सरकार’प्रभावी ठरून भाजपा बहुमताने निवडून आले.

मात्र, गेल्या पाच वर्षात भाजपा सरकारने केवळ घोषणाबाजी केली. कामापेक्षा त्याची जाहिरातच जास्त केली. आपल्याकडे एक म्हण आहे, ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’अशीच काहीशी स्थिती भाजपा आणि मोदी यांच्या कामाची झाल्याची टिका या लोकसभा निवडणुकीत झाली.

सहाव्या टप्प्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत मोदी आणि अमित शहा यांच्या देहबोलीवरुन भाजपाला बहुमत मिळणार नाही, हे चित्र स्पष्ट दिसून येत होते.

सर्व टीव्ही चॅनेल आणि मोठी वृत्तपत्रे यांनी एक्झिट पोल केला आहे. त्यातील सहा टप्प्यातील एक्झिट पोल त्यांच्याकडे तयार आहे. त्यातून बऱ्यापैकी चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्याची माहिती राजकीय पक्षांना मिळाली असल्याचे दिसून येत आहे. त्यातून विरोधकांच्या एकजुटीसाठी हालचाली वाढल्या आहेत. तर भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. भाजपाला २०० – २२० पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि समर्थक पक्षांसह ते बहुमत मिळवू शकेल नाही तर विरोधकांचे सरकार येण्याची शक्यता आहे. त्यातून जोडा जोडी सुरु झाली आहे.

सायंकाळी ६ वाजता सातव्या टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोल सुरु होतील. या एक्झिट पोलच्या जवळपास प्रत्यक्ष निकाल लागले दिसून येतात. त्यामुळे २३ मे ला काय चित्र असेल, याचा अंदाज येतो. त्यामुळे ‘फिर एक बार’ कि ‘बस कर यार’ यापैकी नेमके काय होईल, ते सायंकाळी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.